Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वृक्षारोपण व संवर्धनासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वतंत्र यंत्रणा १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी दीड कोटींचा निधी

वृक्षारोपण व संवर्धनासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वतंत्र यंत्रणा १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी दीड कोटींचा निधी

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे, दि. २ जुलै : पुणे शहरात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अधिक प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये याप्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

भिमाले म्हणाले, 'बैठकीत वृक्षारोपणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या नियमित बैठका आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ११ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक कार्यरत राहणार आहे. या पथकामार्फत वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, धोकादायक वृक्षांची छाटणी, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी या कामांसाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भिमाले म्हणाले, 'वनमहोत्सव २०२६ अंतर्गत पुणे वनक्षेत्रात ३० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वन विभागाच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनेही शहरासाठी स्वतंत्र आणि परिणामकारक वृक्षारोपण आराखडा तयार करावा, यासाठी प्रशासनाला विविध निर्देश दिले. भिमाले पुढे म्हणाले, 'संयुक्त वन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि वन विभाग यांच्यात लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संयुक्त वनव्यवस्थापनासाठी महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्या माध्यमातून शहरात वनीकरणाचे विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

' पुणे महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे आजी-माजी सदस्य तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या आजी-माजी सदस्यांना आणि त्यांच्या पात्र कुटुंबीयांना महापालिकेच्या 'अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजने'चा कायमस्वरूपी लाभ देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. यामुळे संबंधित लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचारांसाठी महापालिकेच्या आर्थिक सहाय्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, शहराच्या विकासात, लोकसेवेत आणि प्रशासकीय कामकाजात योगदान दिलेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींना वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक संरक्षण उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 'अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना' राबविण्यात येते. या योजनेची व्याप्ती वाढवून आजी-माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे आजी-माजी सदस्य, पीएमपीएमएलचे आजी-माजी सदस्य तसेच त्यांच्या पती किंवा पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दिव्यांग अपत्यांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पात्र लाभार्थ्यांना महापालिकेच्या वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत उपचारांसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. विशेषतः हृदयरोग, कर्करोग, शस्त्रक्रिया किंवा इतर गंभीर आजारांच्या उपचारांवर होणारा मोठा खर्च कमी करण्यासाठी या योजनेचा आधार मिळू शकतो. निवृत्तीनंतर नियमित वैद्यकीय सुविधांचा अभाव भासत असलेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींना तसेच त्यांच्या पात्र कुटुंबीयांना उपचारांसाठी आर्थिक संरक्षण उपलब्ध होणार आहे. वाढत्या आरोग्य खर्चाच्या पार्श्वभूमीवर उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळाल्याने वैद्यकीय सेवांचा लाभ घेणे सुलभ होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi