Friday, 02 Aug, 5.29 am माय मेडिकल मंत्रा

होम
एक कॉल कमी करणार डॉक्टरांवरील तणाव

अभ्यासाचं टेन्शन आणि कामाच्या अतिरिक्त ताणामुळे कंटाळून अनेक डॉक्टर नैराश्येत जात आहेत. या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे. यासाठी मुंबई महापालिका पालिका रुग्णालयातील एमबीबीएस, बीडीएस आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी Mental Health Support Programme सुरू करणार आहे.

  • डॉक्टरांना मानसिक आधार देण्यासाठी पालिकेचा नवा उपक्रम
  • Mental Health Support Programme लवकरच सुरू होणार
  • एमबीबीएस आणि पीजी विद्यार्थ्यांचं होणार समुपदेशन
  • डॉक्टरांमधील वाढतं नैराश्य कमी करणं मुख्य उद्देश
  • मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात राबवणार उपक्रम

मुंबई पालिका रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस आणि पीजीच्या प्रशिक्षित डॉक्टरांना मानसिक पाठबळ मिळावं यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने नवा उपक्रम सुरू केला आहे. Mental Health Support Programme असं या उपक्रमाचं नाव असून पालिकेनं यासाठी खासगी स्वयंसेवी संस्थेची निवड केली आहे. या माध्यमातून मानसिक तणावाखाली असणाऱ्या डॉक्टरांचं समुपदेशन केलं जाणार आहे. यासाठी खास हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार असून गरज असणाऱ्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना थेट संपर्क साधता येईल.

पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कुपर रूग्णालयातील एमबीबीएस, बीडीएस आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 'इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ' (आयपीएच) या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाईल. ताणतणावामुळे किंवा वरिष्ठांच्या जाचामुळे विद्यार्थी नैराश्यात जाऊन आतम्हत्येचा मार्ग स्विकारतात.

काही दिवसांपूर्वी नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी यांनी वरिष्ठ डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. असे प्रकार घडू नये तसंच विद्यार्थ्यांना ताणतणाव आणि नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी हा उपक्रम राबवणार आहे.

पालिका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ताणतणावामुळे अनेक विद्यार्थी नैराश्यात जातात आणि आत्महत्येसारखा शेवटचा पर्याय निवडतात. यासाठी विद्यार्थ्यांचं समुपदेशन करून त्यांना या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे.

यासंदर्भात 'माय मेडिकल मंत्रा'शी बोलताना नायर रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल म्हणतात, "वैद्यकीय विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी पालिकेनं 'इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ' या संस्थेची मदत घेण्याचा विचार केला. या संस्थेच्या माध्यमातून मानसिकरित्या खचलेल्या विद्यार्थ्यांचं मानसोपचारतज्ज्ञांद्वारे समुपदेशन केलं जाणार आहे. यासाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रक्रिया सध्या सुरू असून डॉक्टरांमधील नैराश्याचं वाढतं प्रमाण कमी करणं हा मुख्य उद्देश आहे.''

''ऑगस्टपासून या उपक्रमाला सुरूवात होईल. तीन टप्प्यात हा उपक्रम राबवला जाईल. यात विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली सोडवून घेतली जाईल. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल." असंही डॉ. भारमल म्हणाले.

केईएम रुग्णालयातील मार्ड अध्यक्ष डॉ. मनिषकुमार म्हणाले की, ''बऱ्याचदा विद्यार्थी मनमोकळेपणे बोलू शकत नाहीत. पण हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. त्यामुळे पालिकेने सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच स्वागर्ताह आहे. परंतु डॉक्टरांमध्ये तणाव का वाढतोय याचा विचार व्हायला पाहिजे. जेणेकरून ही समस्या सोडवणं सोपं होईल."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top