Tuesday, 18 Feb, 4.38 pm माय मेडिकल मंत्रा

होम
गरोदरपणात उच्च रक्तदाब. भविष्यात हृदयाच्या आजारांचा धोका

गरोदरपणात उच्च रक्तदाब असणाऱ्या महिलांना भविष्यात हृदयाच्या आजार बळावतात, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

गरोदरपण म्हणजे महिलेचा दुसरा जन्म म्हटला जातो. खरंच एका नव्या जिवाला जन्म देताना आईला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. गरोदरपणात अनेक समस्या, गुंतागुत निर्माण होतात आणि त्यापैकीच एक म्हणजे उच्च रक्तदाब. गरोदरपणात उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य समजली जात असली, गरोदरपणात त्यावर नियंत्रण ठेवलं जात असलं, तरी भविष्यात आईच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो.

गरोदरपणात उच्च रक्तदाब असणाऱ्या महिलांना भविष्यात हृदयाचे आजार बळावतात, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. लंडनमधील किंग्ज कॉलेजच्या संशोधकांनी केलेलं हे संशोधन जर्नल सर्क्युलेशनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

संशोधकांनी १३ लाख महिलांचा २० वर्ष अभ्यास केला. १८,६२४ जणांना हार्ट अटॅक, स्ट्रोक, हार्ट फेलर असे हृदयासंबंधी आजार बळावले. ४० पेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये याचं प्रमाण ६५ टक्के होतं.

गरोदरपणात उच्च रक्तदाब असलेल्या आणि उच्च रक्तदाब नसलेल्या महिलांची तुलना केली असता. ज्या महिलांना गरोदरपणात उच्च रक्तदाब होता, त्यांना स्ट्रोक, हार्ट अटॅक, हार्ट फेलर अशा हृदयाच्या आजारांचा धोका जास्त होता. उच्च रक्तदाब नसलेल्या महिलांच्या तुलनेत उच्च रक्तदाब असलेल्या महिलांचा हृदयाच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण दुप्पट होतं.

संशोधनाचे मुख्य अभ्यासक डॉ. फर्ग्युस मॅकर्थी म्हणाले, "गरोदरपणात ज्या काही समस्या निर्माण होतात त्याच्या आईच्या आरोग्यवर दीर्घकालीन परिणाम होतो. त्यामुळे गरोदरपणात उच्च रक्तदाब असलेल्या महिलांना भविष्यात हृदयाच्या आजारांचा धोका बळावू शकतो, हे लक्षात घेत त्या महिलांवर त्यादृष्टिने उपचार करून त्यांचा हा धोका कमी करायला हवं"

उच्च रक्तदाब असलेल्या या महिलांचा हा धोका कसा कमी करता येईल, यादृष्टिने संशोधकांनी आता अभ्यास सुरू केला आहे. आहारात बदल, मिठाचं कमी प्रमाण, व्यायाम किंवा औषधं या कोणत्या मार्गाने गरोदर महिलांचा भविष्यातील हृदयाच्या आजारांचा धोका टाळता येईल, यादृष्टिने आता प्रयत्न सुरू आहेत.

पुण्यातील प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगविभागाच्या कन्सलटंट डॉ. राजेश्वरी पवार यांनी सांगितलं, ''गरोदर महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळून येतो, याचं वेळीच निदान होणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे रक्तदाब कमी करण्यासाठी औषधं सुरू करणं, वैद्यकीय चाचण्या, बाळाच्या हालचाली, सोनोग्राफी आणि डॉपलरच्या माध्यमातून माता आणि गर्भाशयातील बाळावर देखरेख ठेवणंही गरजेचं असतं. यात गर्भातील बाळाला धोका असल्याचं लक्षात येता तातडीने प्रसूती करावी लागते. जेणेकरून दोघांचे प्राण वाचवता येऊ शकतील.''

सोर्स - किंग्ज कॉलेज लंडन

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top