Saturday, 25 Aug, 1.12 am माय मेडिकल मंत्रा

महाराष्ट्र
#HealthOfKerala : 'एफडीए'द्वारे पुन्हा एकदा केरळला औषध पुरवठा

केरळमध्ये अचानक उद्भवलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. केरळमधील अनेक ठिकणच्या वैद्यकीय सेवाही ठप्प झाल्यात. केरळची आरोग्य व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी मदत करतंय. त्यानुसार, प्रथम महाराष्ट्रातून 100 डॉक्टरांची टीम वैद्यकीय मदतीसाठी पाठवण्यात आली. ही टीम केरळवासियांना वैद्यकीय उपचार पुरवतेय. मात्र पूरग्रस्त केरळला अजूनही औषधांची मदत पाहिजे. यासाठीच महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा पुढाकार घेतला असून राज्याच्या अन्न आणि औषध विभागाद्वारे केरळमध्ये औषधं पाठवण्यात आलीयेत.

सकाळी 10 वाजता वांद्रेच्या एफडीएच्या कार्यालयातून हा औषधांचा साठा ट्रकच्या माध्यमातून पाठवण्यात आलाय. हा ट्रक विमानतळावर जाऊन त्यानंतर नौदलाच्या विमानाद्वारे तो केरळमध्ये पोहोचवण्यात येणारे.

यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी माय मेडिकल मंत्राला दिलेल्या माहितीनुसार, "केरळला पूरजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करतंय. याकरता महाराष्ट्रातील काही डॉक्टर केरळवासियांना वैद्यकीय सेवा पुरवत असून काही औषधांचा मुबलक साठाही पाठवण्यात आला होता. मात्र, गरज लक्षात घेता औषधांअभावी नागरिकांवरील उपचार थांबू नयेत म्हणून दुसऱ्या टप्प्यात पुन्हा औषधांचा साठा पाठवला जातोय. महिनाभर पुरेल इतकी ही औषधं आहेत. यात अॅन्टीबायोटिक्स औषधं, इंजेक्शन, सलाईन, हृदयविकार, मधुमेहावरील औषंध, महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन आणि मलमपट्टीसाठी आवश्यक साधने पाठवण्यात येतायत.''

''गरज लागल्यास अधिक औषधंही पुरवली जातील. यासाठी महाराष्ट्रातील विविध केमिस्ट आणि फार्मासिस्टना त्यांच्याकडील औषधांचा साठा पुरवण्याचं आवाहन केलंय. याशिवाय केरळवासियांना यातून बाहेर काढण्यासाठी सरकारसह आता नागरिकांनीही पुढाकार घेत मदत करणं गरजेचं आहे. कारण लोकांनी एकत्रित येऊन प्रयत्न केल्यास केरळला पुन्हा एकदा उभं करता येईल'' असंही बापट म्हणाले.

Dailyhunt
Top