Tuesday, 23 Apr, 3.05 am माय मेडिकल मंत्रा

होम
HIV-टीबीग्रस्त रुग्णांना एकाच ठिकाणी मिळणार औषधोपचार

एचआयव्हीग्रस्त टीबी रुग्णांवर एकाच ठिकाणी औषधोपचार व्हावेत यासाठी मुंबईच्या शिवडीतील टीबी रुग्णालयात एआरटी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 'मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी'नं 'नॅको'ला पत्र पाठवून याबाबत परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर मुंबईत हे नवे एआरटी केंद्र सुरू होईल.

एचआयव्ही आणि टीबीची लागण झालेल्या रुग्णांना उपचारांसाठी तारेवरची कसरत करावी लागते. एकिकडे मुंबईतील क्षय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतात तर दुसरीकडे केईएम रुग्णालयातील एआरटी केंद्रात नोंदणी असल्यानं औषधोपचारासाठी तिथंही जावं लागतं. अशा रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे.

एचआयव्ही आणि टीबी असलेल्या रुग्णांना एकाच ठिकाणी दोन्ही आजारांची औषध उपलब्धं व्हावीत, यासाठी टीबी रुग्णालयात एआरटी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

यासंदर्भात 'माय मेडिकल मंत्रा'शी बोलताना क्षय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांनी सांगितलं की, ''एचआयव्ही रुग्णांमध्ये टीबीची लागण होण्याचं प्रमाण अधिक आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी 25 टक्के रुग्ण एचआयव्ही बाधित असतात. या रुग्णांना औषधोपचारासाठी केईएम रुग्णालयात जावं लागतं. असे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा हा त्रास कमी करता यावा, यासाठी आता क्षय रुग्णालयातच एआरटी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यास रुग्णांचा वेळ वाचणार आहे''

'मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी'च्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितलं, ''एचआयव्हीमुळे अनेक रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे टीबीसारख्या संसर्गजन्य आजाराची लागण पटकन होते. क्षय रुग्णालयात दाखल होऊन उपचार सुरू असणाऱ्या एचआयव्हीग्रस्त टीबी रुग्णांची केईएममधील 'एआरटी' केंद्रात नोंदणी होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना याठिकाणी जाऊन एचआयव्हीची औषधं घ्यावी लागतात. मात्र क्षय रुग्णालयात एआरटी केंद्र सुरू झाल्यास रुग्णांना एचआयव्ही आणि टीबीची औषधं एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील''

डॉ. आचार्य पुढे म्हणाल्या की, ''टीबी रुग्णालयात एआरटी केंद्र सुरू करण्यासाठी 'नॅको'ला लेखी पत्र पाठवलं आहे. अद्याप परवानगी मिळालेली नाही. मात्र, त्यापूर्वी टीबी रुग्णालयातील डॉक्टरांना एचआयव्ही औषधांबाबत आणि रुग्णांचं समुपदेशन कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे''

मुंबईत दरवर्षी 1,500 एचआयव्ही बाधितांना टीबीची लागण होते. यात बऱ्याचदा टीबीवर उपचार सुरू असताना रुग्ण एचआयव्हीग्रस्त असल्याचं कळतं. अशावेळी टीबीसह एचआयव्ही उपचारही तातडीनं सुरू करावे लागतात. आजाराचं वेळीच निदान आणि उपचार झाल्यास एचआयव्ही रुग्णांचा टीबी बरा करता येऊ शकतो.

मुंबईत सध्या 280 ठिकाणी एचआयव्ही चाचणी होते. तर पालिका आणि सरकारी रुग्णालयात 17 एआरटी केंद्र सुरू असून चार मोबाईल व्हॅन उपलब्ध आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top