Wednesday, 24 Apr, 4.23 pm माय मेडिकल मंत्रा

होम
इलेक्शन ड्युटीची सक्ती नाही, अंगणवाडी सेविकांना कोर्टाचा दिलासा

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना इलेक्शन ड्युटीची सक्ती नको, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. त्यामुळे 2 लाख अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविकांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. अंगणवाडी आणि मदतनीस यांना इलेक्शन ड्युटीची सक्ती नको, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. अंगणवाडी सेविकांना निवडणुकीच्या कामात जुंपण्याच्या निर्णयाला विरोध करत, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना 'महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटने' चे सचिव राजेश सिंह यांनी सांगितलं की, ''अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यंदाच्या इलेक्शन ड्युटीला लावण्यात आलं होतं. आधीच कर्मचाऱ्यांना 2 महिने मानधन मिळालेलं नाही. त्यात अतिरिक्त कामाची जबाबदारी दिली जात असल्यानं या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाची सक्ती करू नये, असं म्हटलं आहे.''

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या उप-सचिव चेतना सुर्वे यांनी सांगितलं की, '' या याचिकेवर अंगणवाडी संघटनेचं न्यायालयानं म्हणणं जाणून घेतलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटीची सक्ती नको, असे आदेश सरकारला दिलेत. याशिवाय काम करण्याची इच्छा नसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईही करता येणार नसल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे."

केंद्र सरकारनं 2010 मध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार अंगणवाडी सेविका आणि विविध संस्थांना निवडणुकीच्या कामांतून वगळण्यात आलं होतं. निवडणूक आयोगानंही अंगणवाडी सेविकांना निवडणुकीचे काम लावू नये, असं म्हटलं होतं. पण तरीही अंगणवाडी सेविकांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लावण्याचा आणि काम न करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. त्यानंतर राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top