Monday, 13 May, 1.45 am माय मेडिकल मंत्रा

होम
जूनमध्ये अंगणवाडी सेविका मंत्रालयावर धडकणार

मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविका पुन्हा आंदोलन छेडणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक जिल्हा परिषद कार्यालयावर तर 11 जून, 2019 ला मंत्रालयावर विराट मोर्चा काढणार, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मानधनात दुपटीनं वाढ केली होती. नोव्हेंबर 2018 मध्ये ही मानधन वाढ अंगणवाडी सेविकांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र महाराष्ट्र सरकारनं अद्यापही मानधन वाढ लागू केलेली नाही.

याबाबत अनेकदा आंदोलन करूनही सरकारकडून फक्त आश्वासन मिळत असल्यानं अंगणवाडी सेविका संतप्त झाल्यात आणि पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अंगणवाडी सेविका प्रत्येक जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चानंतर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यास 11 जून, 2019 ला अंगणवाडी सेविका मंत्रालयावर विराट मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडणार आहेत. राज्यभरातील 2 लाख अंगणवाडी सेविका या मोर्चात सहभागी होणार आहेत.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी सांगितलं की, "राज्य सरकार अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीबाबत कोणत्याही हालचाली करत नाही आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी आता जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या ठाणे येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय आंदोलनाची रुपरेखा ठरवण्यात आली आहे. राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी येत्या 11 जूनला मंत्रालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे"

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सचिव भगवान दवणे म्हणाले, "महिला आणि बाल कल्याण मंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची अनेकदा बैठक झाली. बैठकीत सविस्तर चर्चा होऊन मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं. मात्र पुढे काहीच झालं नाही. या पार्श्वभूमीवर सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आता येत्या 4 जूनला आशा सेविका तर 11 जूनला अंगणवाडी सेविका मंत्रालयावर विराट मोर्चा काढणार आहेत"

प्रमुख मागण्या

  • मानधनात वाढ करा
  • सरकारी सेवेत सामावून घ्या
  • सेवासमाप्ती लाभाच्या रकमेत तिपटीनं वाढ करा
  • कर्मचाऱ्यांना मासिक 5 हजार रुपये पेंशन योजना लागू करा
  • अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी रजिस्टर आणि अहवाल फॉर्म द्या
  • वर्षातून 15 दिवसांची आजारपणासाठी भरपगारी रजा
  • अंगणवाडी सेविकांची त्यांच्या इच्छेनुसार आवश्यक ठिकाणी रिक्त जागी बदली करा
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top