Tuesday, 18 Feb, 12.41 pm माय मेडिकल मंत्रा

होम
महिलांना 'त्या' जागी होणारे त्वचेचे आजार

स्त्रियांमध्ये प्रामुख्याने त्वचेच्या समस्या उद्भवण्याचं प्रमाण अधिक दिसून येतं. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार महिलांना योनीमार्गाजवळील त्वचेचंही इन्फेक्शनही होऊ शकतं.

थंडी असो किंवा उन्हाळा असो स्किन इन्फेक्शन म्हणजे त्वचेच्या समस्या या अनेकांना दिसून येतात. स्त्रियांमध्ये प्रामुख्याने त्वचेच्या समस्या उद्भवण्याचं प्रमाण अधिक दिसून येतं. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार महिलांना केवळ हाता पायावर नाही तर योनीमार्गाजवळील त्वचेचंही इन्फेक्शनही होऊ शकतं.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना त्वचारोगतज्ज्ञ डॉ. बिंदू स्थळेकर म्हणाल्या, "योनीमार्गाजवळ असलेल्या त्वचेला देखील इन्फेक्शन किंवा रॅशेस होण्याची शक्यता असते. यामध्ये महिलांना त्या भागातील त्वचेला खाज येणं, रॅशेस येणं, त्वचा जाड होणं याशिवाय फंगल इन्फेक्शन आणि जळजळ अशा प्रकारच्या समस्या दिसून येतात. भारतात प्रामुख्यानेे उष्णता आणि आर्द्रतेमुळे महिलांमध्ये त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसतात. तर काही महिलांमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन, सोरायसिस, डर्मेटायटीस, एक्झामा या समस्या देखील सामान्यपणे दिसून येतात."

महिलांमध्ये दिसून येणाऱ्या त्वचेच्या समस्या

एक्झामा

एक्झामा ही समस्या शरीराच्या कोणत्याही भागावर दिसून येते. महिलांना योनीमार्गाजवळच्या त्वचेवर ही समस्या दिसून येण्याची शक्यता असते. यामध्ये त्वचा लाल होणं, रॅशेस येणं, जळजळ या तक्रारी जाणवतात.

सोरायसिस

सतत घट्ट किंवा नायलॉनचे कपडे घातल्याने महिलांमध्ये सोरायसिसची समस्या दिसून येते. मुख्य म्हणजे योनीमार्गाजवळच्या त्वचेवर देखील ही समस्या दिसून येते. यामध्ये त्वचेवर गडद लाल रंगाचे डाग दिसू लागतात. त्यासोबत त्वचा कोरडी पडते. योनीमार्गाजवळील त्वचा ही शरीराच्या इतर त्वचेपेक्षा पातळ असते. त्यामुळे त्या भागातील त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी.

कॉन्टॅक्ट डर्मेटायटीस

अनेक महिला योनीमार्गाजवळ ल्यूब किंवा पर्फ्यूमचा वापर करतात. मात्र याच्या वापरामुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते. अशा गोष्टींच्या संपर्कामुळे त्वचेला अॅलर्जी होऊ शकते. याला कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस असं म्हणतात. यामध्ये काही महिलांना साबण किंवा ल्यूबच्या संपर्कात आल्यास त्वचा लाल होण्याची समस्या जाणवते.

इंटरट्रिगो

शरीराचा भाग ज्या ठिकाणी दुमडला जातो त्या ठिकाणी इंटरट्रिगो ही समस्या होण्याची शक्यता असते. अतिप्रमाणातील उष्णता, आर्द्रता किंवा ज्या भागातील त्वचेला पुरेशा प्रमाणात हवा मिळत नसेल त्या ठिकाणी हा त्रास होऊ शकतो.

मुंबईतील त्वचरोगतज्ज्ञ डॉ. शमा विभावर म्हणाल्या, "योनीमार्गाजवळ असलेल्या त्वचेला देखील इन्फेक्शन जाणवतं. महिलांमध्ये प्रामुख्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन आणि वायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात दिसतं."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top