Tuesday, 10 Sep, 1.00 pm माय मेडिकल मंत्रा

होम
मानसोपचारतज्ज्ञ घडवण्यासाठी लवकरच 'सेंटर ऑफ एक्सलन्स'!

मनोरुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्रात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता आहे. राज्यात मानसोपचार डॉक्टरांची संख्या वाढावी यासाठी राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत मानसिक आरोग्याशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. याप्रकरणी लवकरच 'सेंटर ऑफ एक्सलन्स' केंद्र स्थापन करण्यात येणारे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

मनोरुग्णांच्या तुलनेत राज्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांची संख्या खूप कमी आहे. मानसोपचारतज्ज्ञांची संख्या वाढावी यासाठी राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 17 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आहेत. यातील नऊ महाविद्यालयांत मानसोपचार अभ्यासक्रम शिकवला जातो. परंतु उर्वरित आठ वैद्यकीय महाविद्यालयात मानसोपचार विषयात पदव्युत्तर शिक्षण (पीजी) दिलं जात नाही. मानसिक आरोग्याशी संबंधित वाढत्या समस्या लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या धोरणानुसार राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत विशेषज्ञांची उपलब्धता वाढण्यासाठी उपाययोजना सूचवण्यात आल्यात. त्याअंतर्गत मानसिक आरोग्याचे बळकटीकरण करून राज्याला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयानुसार, राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथे 'सेंटर ऑफ एक्सलन्स' उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारद्वारे 5.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय.

सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून राज्यात

  • एमडी सायकिॲट्रीच्या चार जागा
  • एमफील (क्लिनीकल सायकॉलॉजी) 16 जागा
  • एमफील (सायकियाट्रिक सोशल वर्कर) 16 जागा
  • डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग- 40 जागा

याप्रमाणे पुणे, ठाणे आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय-प्रादेशिक मनोरुग्णालयात जागा निर्माण होणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी 60 टक्के अर्थसहाय्य केंद्र शासनाकडून प्राप्त होणार असून उर्वरित 40 टक्के खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे.

टीबी रुग्णालयातील सहाय्यक मेंदूविषयक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राहुल भातांब्रे यांनी सांगितलं, "राज्यातील मोजक्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातोय. उर्वरित महाविद्यालयांत हा विषय शिकवला जात नाहीये. पण सध्या डॉक्टरांकडे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे सरकारने मानसोपचार तज्ज्ञ घडवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा नक्कीच फायदा होईल.''

शीव रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर कारिया म्हणाले की, "मनोरुग्णांवर तातडीने उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. यासाठी मानसोपचार तज्ज्ञ मोठ्यासंख्येने तयार होणं गरजेचं आहे. जेणेकरून रुग्णाचं निदान व उपचार पटकन होऊ शकेल."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top