Wednesday, 19 Jun, 9.29 am माय मेडिकल मंत्रा

होम
मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांना PG साठी आरक्षण देणार - गिरीष महाजन

सुमारे दोन हजार वाढीव जागांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत दिली.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गातून पदव्युत्तर वैद्यकीय/दंत अभ्यासक्रमासाठी आरक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सुमारे दोन हजार वाढीव जागांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत दिली.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण उपलब्ध करून देण्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य हेमंत टकले यांनी मांडली होती.

त्याला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, "राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास (एसईबीसी) नागरिकांच्या वर्गांच्या प्रगतीसाठी 30 नोव्हेंबर 2018 रोजी अधिनियम प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाकडून 8 मार्च 2019 अन्वये आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता (एसईबीसी) 16 टक्के आरक्षण लागू असल्याचं पत्र निर्गमित करण्यात आले. या एसईबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला आहे"

महाजन पुढे म्हणाले, "या अधिनियमानुसार शैक्षणिक वर्ष 2019-20च्या वैद्यकीय आणि दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या राज्यस्तरीय कोट्याचा प्रवेशाकरिता एसईबीसी 16 टक्के आरक्षण अंतर्भुत करून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांनी संकेतस्थळावर वैद्यकीय आणि दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांचा आरक्षणनिहाय तक्ता अनुक्रमे 27 मार्च 2019 आणि 29 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध केला"

"20 मे 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या अध्यादेशास आणि त्यानुसार राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेस काही याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानुषंगाने 24 मे 2019 रोजी हे प्रकरण प्रथम संबंधित उच्च न्यायालयासमोर मांडण्याचं सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार याचिकाकर्त्यांकडून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने 13 जून 2019 रोजीच्या आदेशानुसार ही याचिका फेटाळली आहे. त्याविरोधात सुद्धा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून या प्रकरणाची सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली असून हे प्रकरण सद्यस्थितीत न्यायप्रविष्ठ आहे", असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top