Thursday, 25 Apr, 10.53 am माय मेडिकल मंत्रा

होम
मतदार महिलांना मिळणार सॅनिटरी पॅड

मुंबई उपनगरातील सखी मतदान केंद्रांवर मतदान करणाऱ्या महिलांना सॅनिटरी पॅड देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे.

राज्यात 29 एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यावेळी मतदान करणाऱ्या महिलांना सॅनिटरी पॅड देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. मुंबई उपनगरातील सखी मतदान केंद्रावर हे सॅनिटरी पॅड मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महिलांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा यासाठी निवडणूक आयोग हा अनोखा उपक्रम राबवत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे 300 सखी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही केंद्रं महिला मतदारांसाठी असून याठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व महिलाच कार्यरत आहेत. मुंबईत उपनगरातील 26 विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्र आहेत. कुर्ला, अंधेरी आणि बोरीवली अशा 3 प्रशासकीय विभागांचा यात समावेश आहे.

एका निवडणूक अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या मतदान केंद्रावरील प्रत्येक मतदार महिलेला सॅनिटरी नॅपकिनचं पाकीट दिलं जाईल. तसंच महिला आणि पुरुषांसाठी मतदान केंद्रावर शीतपेयाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मतदान केंद्र अधिक आकर्षित करण्यासाठी रांगोळीही काढण्यात आली आहे.

राज्यातील 48 लोकसभा जागांसाठी 4 टप्प्यात मतदान होतं. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 7 जागांसाठी, 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात 10 जागांसाठी आणि 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान पार पडलं. तर आता 29 एप्रिलला चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईतील मतदारसंघांसह 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top