Wednesday, 17 Jul, 8.21 am माय मेडिकल मंत्रा

होम
MBBSच्या गुणांवर PG प्रवेश - तज्ज्ञांकडून स्वागत, विद्यार्थ्यांचा विरोध

MBBSच्या गुणांवरच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचा प्रवेश ठरवणार असा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक 2019ला मान्यता दिली. एमबीबीएसची परीक्षा हीच नॅशनल एक्झिट एक्झाम असेल असा निर्णय सरकारने दिला. याबाबत वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांच्या संघटनेची काय मतं आहेत, हे माय मेडिकल मंत्रानं जाणून घेतलं.

वैद्यकीय संघटना आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा भार कमी होईल, शिवाय उत्तम डॉक्टर मिळतील असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाने MBBSची शेवटची परीक्षा एक्झिट एक्झाम ठरवून त्यावरच पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा जो निर्णय घेतला आहे, हे खूपच चांगलं पाऊल आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनची ही अनेक वर्षांपासून मागणी होती. या निर्णयामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांवरील ताण कमी होईल"

हिंदुजा हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. अविनाश सुपे म्हणाले, "केंद्रीय मंत्रिमंडळाने वैद्यकीय परीक्षेबाबत घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र सरकारनं त्याची नीट अंमलबजावणी करणं फार गरजेचं आहे. अनेकदा MBBSचे विद्यार्थी NEET परीक्षेवर लक्ष केंद्रीत करतात. NEET साठी MBBSच्या शेवटच्या परीक्षेकडे फारसं लक्ष देत नाहीत. MBBS परीक्षा नॅशनल एक्झिट परीक्षा हा सरकारने जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांना MBBSच्या परीक्षेची नीट तयारी करावी लागेल"

"तसंच या निर्णयामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणं शक्य होईल आणि त्यामुळे आपल्याला उत्तम डॉक्टर मिळतील, असंही डॉ. सुपे म्हणाले.

हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे असं जरी तज्ज्ञांनी म्हटलं तरी वैद्यकीय विद्यार्थ्यांना हा निर्णय मान्य नाही. त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

नागपूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील मार्डचे जनरल सचिव शुभम इंगळे म्हणाले, "केंद्र सरकारचा हा निर्णय आम्हाला पटलेला नाही. MBBSच्या परीक्षेत सविस्तर उत्तरं लिहावी लागतात. मात्र नीटच्या परीक्षेत एमसीक्यू फॉरमेट असतो. त्यामुळे जे विद्यार्थी हुशार आहेत मात्र त्यांना उत्तरं नीट मांडता येणार नाहीत त्यांचं नुकसान होईल. तसंच सरकारने घेतलेला हा निर्णय तसा नवा नाही. 15 वर्षांपूर्वीदेखील परीक्षेची अशीच पद्धत होती"

एमबीबीएसच्या शेवटच्या सर्वात शिकणारा विद्यार्थी म्हणाला, "परीक्षेची पद्धत नेमकी कशी असणार हा प्रश्न आहे. कारण जर ही परीक्षा NEET प्रमाणे एमसीक्यू पद्धत असेल तर हा निर्णय फायदेशीर आहे. मात्र जर MBBSच्या सध्या असलेल्या प्रश्नोत्तर पद्धतीनुसार असेल तर मात्र हा निर्णय फायद्याचा नाही. कारण जर विद्यार्थ्यांचं लिखाण कौशल्य चांगलं नसेल तर त्यांचं मोठं नुकसान होईल कारण या एका परीक्षेवर त्याचं भविष्य ठरणार आहे"

तर पदव्युत्तर शिक्षणासाठी असलेली परीक्षा ही इंटर्नशीपनंतर असावी, असं मत राज्यातील निवासी डॉक्टरांच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी मांडलं आहे, त्या म्हणाल्या, "वैद्यकीय विद्यार्थी ज्यावेळी इंटर्नशिप करतात त्यावेळी कोणत्या विषयाची त्यांना आवड आहे हे समजतं. त्यामुळे पदव्युत्तर प्रवेशासाठी असलेली परीक्षा ही इंटर्नशीपनंतर असली पाहिजे. शिवाय या परीक्षेचा पॅटर्न निश्चित असणं गरजेचं आहे. अजून एक मुद्दा म्हणजे जितकी मुलं एमबीबीएस होतील तेवढ्या पदव्युत्तर शिक्षणासाठी जागाही उपलब्ध झाल्या पाहिजेत"

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top