Thursday, 26 Sep, 6.44 pm माय मेडिकल मंत्रा

होम
मुंबई - डॉक्टरांना निवडणूक ड्युटी नाही

मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयासह ४ रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावाचा निवडणूक प्रक्रिया काम करण्याच्या यादीत समावेश होता. यानंतर डॉक्टरांनी मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि डॉक्टरांना निवडणूक ड्युटी नसल्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेत काम करण्यासाठी अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. ज्यामध्ये डॉक्टरांचाही समावेश होता. मात्र डॉक्टरांची अत्यावश्यक सेवेची जबाबदारी लक्षात घेता डॉक्टरांना निवडणूक ड्युटी नको यासाठी डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर डॉक्टरांना निवडणूक ड्युटी न लावण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

निवडणूक प्रक्रियेत काम करण्यासाठी मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, कामा रुग्णालय, जीटी रुग्णालयातील अनेक डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश होता. या रुग्णालयात दररोज अनेक रुग्ण उपचारांसाठी येतात, दररोज शेकडो शस्त्रक्रिया पार पडतात, रुग्णांच्या आजारांच्या निदानासाठी रोज विविध चाचण्या कराव्या लागतात. या सर्व बाबी विचारात घेऊन आणि रुग्णालयाच्या अत्यावश्यक सेवेचा दर्जा लक्षात घेऊन रुग्णालयातील डॉक्टरांनी मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, "निवडणूक प्रक्रियेत काम करण्यासाठी सर जे.जे. समूह रूग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. चारही रूग्णालयातील जवळपास 600 डॉक्टरांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या सकारात्मक निर्णयामुळे आता रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेच्या कामातून सूट मिळणार आहे"

माय मेडिकल मंत्राशी बोलताना मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सांगितलं, "डॉक्टरांना निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करता येत नाही. पण आमच्याकडे आलेल्या माहितीमध्ये काही डॉक्टरांच्या नावासमोर कर्मचारी लिहून आलं होतं. या कारणासाठीच डॉक्टरांनी माझी भेट घेतली होती. त्यामुळे डॉक्टरांना निवडणुकीची ड्युटी लावली जाणार नाही"

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top