Monday, 22 Apr, 4.05 am माय मेडिकल मंत्रा

होम
पगार नाही तर काम नाही, अंगणवाडी सेविकांचा निर्धार

राज्यातील अंगणवाडी सेविकांना मार्च 2019 पासून मानधन मिळालेलं नाही. जर येत्या 1 मे पूर्वी अंगणवाडी सेविकांचं रखडलेलं मानधन मिळालं नाही तर सरकारचं कुठलंही काम करणार नाही, अशा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेकडून देण्यात आलाय.

  • महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका दोन महिने मानधनापासून वंचित
  • अंगणवाडी सेविकांचं मानधन थकबाकी
  • गेल्या दोन महिन्यांचं मानधन रखडलं
  • मानधन न दिल्यास कामबंद करण्याचा इशारा

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत असताना आता गेल्या दोन महिन्यांपासून या अंगणवाडी सेविकांना मानधन मिळालं नाहीये. जर येत्या 1 मे पूर्वी अंगणवाडी सेविकांचं रखडलेलं मानधन मिळालं नाही तर सरकारचं कुठलंही काम करणार नाही, अशा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेकडून देण्यात आलाय.

राज्यातील अंगणवाडी सेविकांना मार्च 2019 पासून मानधन मिळालेलं नाही. एकात्मिक बालविकास सेवा योजनेतअंतर्गत राज्यात सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका काम करतायत. यामध्ये मुंबईतील साडे आठ हजार अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. या सेविकांना कामाच्या स्वरूपात मिळणारं मानधन हे अतिशय कमी आहे.

त्यातच गेले दोन महिने मानधन नसल्याने अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबियांवर आता उपासमारीची वेळ आलीये. यामुळे 1 मे पर्यंत थकीत मानधन द्या, नाहीतर अंगणवाडी सेविका लाभार्थींना फक्त आहार वाटप करतील. इतर कोणतेही काम करणार नाही अशा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेने दिलायं. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठवण्यात आलंय.

यासंदर्भात 'माय मेडिकल मंत्रा'शी बोलताना 'महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघा'चे सचिव राजेश सिंह म्हणाले की, "राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्यापासून मानधन मिळालेलं नाही. यासंदर्भात सरकारकडे विचारणा केली असता सर्व अधिकारी निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याचं उत्तर मिळालं. पण या सेविकांना मानधन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांचे हाल होतायत."

राजेश पुढे म्हणाले, "मे महिन्यात सरकारी आदेशानुसार, अंगणवाडी कर्मचारी उन्हाळी रजेवर जातात. मानधन न मिळाल्यानं त्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे 1 मे पूर्वी सरकारने अंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात रखडलेलं मानधन जमा करावं, अन्यथा 25 एप्रिल पासून अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना आहार वाटप करतील आणि सरकारची अन्य कुठलेही काम करणार नाहीत."

सेविकांच्या या निर्णयामुळे सरकारची सर्व काम ठप्प पडतील. यामुळे मार्च महिन्याचं मानधन तातडीने कर्मचाऱ्यांना देऊन त्यांच्या कुटुंबाची होणारी उपासमार थांबवावी आणि मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीमध्ये जाण्यापूर्वी एप्रिल महिन्यांचे मानधन अंगणवाडी सेविकांना देण्यात यावं, अशी मागणीही अंगणवाडी सेविकांनी केलीये.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top