Friday, 14 Feb, 1.26 pm माय मेडिकल मंत्रा

होम
प्रसूतीपूर्व स्तनांची चाचणी करणं महत्त्वाचं!

स्तनपान नवजात बालकासाठी खूप महत्त्वाचं असतं. जन्मापासून 6 महिने बाळ आईच्या दुधावरच अवलंबून असतं. त्यामुळे महिलांनी गर्भावस्थेतच स्तनांची चाचणी करून घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करताना अडथळे येणार नाहीत. असं मुंबईतील चेंबूरच्या झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वीणा औरंगाबादवाला यांनी सांगितलंय.

स्तनपान म्हणजे पोषणयुक्त, नैसर्गिक, किफायतशीर आणि चांगलं अन्न, जे नवजात बालकाला त्याच्या आईकडून मिळतं. आईचं दूध म्हणजे अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा स्रोत असते, ज्यामुळे नवजात बालकाच्या जन्मापासून 6 महिन्यांपर्यंत त्याच्या शरीराच्या गरजा भागतात. आईच्या दुधातून बाळाला अत्यावश्यक असं इम्युनोग्लोबिन्स मिळतं, ज्यामुळे बाळाला इन्फेक्शन आणि आजारांपासून संरक्षण मिळतं.

स्तनपानामुळे बाळाशिवाय आईलाही फायदा होतो. यामुळे बाळाचं आईशी नातं जोडलं जातं. तसंच गरोदरपणात आईचं वाढलेलं वजन लवकर कमी होण्यासाठी मदत होते. स्तनपान न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत स्तनपान करणाऱ्या महिलांना सर्व्हायकल कॅन्सरचा धोका कमी असतो.

प्रसूतीपूर्व स्तनांची चाचणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्यांदाच गर्भवती असलेल्या महिलांनी डॉक्टर किंवा वैद्यकीय तज्ज्ञांकडून स्तनांची चाचणी करून घेणं. जेणेकरून स्तनांमधील बदल दिसून येतील. त्यामुळे बाळाच्या जन्माआधीच त्यावर योग्य ते उपचार करता येतील आणि बाळाच्या जन्मानंतर स्तनपानात अडथळे येणार नाहीत.

गर्भवती महिलांमध्ये बहुधा निपल्समध्ये फरक दिसून येतो. यामध्ये बदल करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यांनंतर वापरू शकतो. प्रत्येक महिलेला स्वत:च्या स्तनांचं परीक्षण करता आलं पाहिजे.

काय करावं आणि काय करू नये.

हे करा

  • तुमच्या स्तनात काही बदल जाणवल्यास तुमच्या डॉक्टरांना दाखवा आणि त्यांचा सल्ला घ्या.
  • गर्भावस्थेत स्तनांच्या आकारमानात बदल होत असल्याचं लक्षात घ्या आणि त्यानुसार आरामदायी आणि सैलसर कपडे घाला.

हे करू नका

  • स्तनांना वेदना होतील असं काही करू नका.
  • घट्ट कपडे घालू नका
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्तनांमध्ये सुधारणा करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले प्रोडक्ट वापरू नका.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top