Tuesday, 23 Apr, 4.45 am माय मेडिकल मंत्रा

होम
पुणे- सायकल चालवण्याच्या नादापायी बघा काय झालं.

जळगावला राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाला काही महिन्यांपूर्वी सतत पाय दुखत असल्याचा त्रास जाणवत होता. या मुलाला PAES असल्याचं निदान करण्यात आलं. हा दुर्मिळ पद्धतीचा त्रास असून योग्यवेळी निदान झाल्याने उपचार करणं सोप झालं.

सोर्स-गुगल

व्यायाम व्हावा म्हणून आपण अनेकदा सायकल चालवण्याचा विचार करतो. आता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुल हमखास सकाळ-संध्याकाळ सायकल चालवण्याच्या मागे असतात. सायकल चालवणं हे शारीरिक हालचालीसाठी उपयुक्त असतंच. मात्र अतिप्रमाणात सायकल चालवणं जळगावच्या एका मुलाला भारी पडलंय. अतिप्रमाणात सायकल चालवल्याने या मुलाच्या पायातील रक्तवाहिन्या बदलून टाकाव्या लागल्यात.

जळगावला राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाला काही महिन्यांपूर्वी सतत पाय दुखत असल्याचा त्रास जाणवत होता. दहावीत असल्याने त्याचे दररोज क्लासेस सुरु होते. रोज सायकलने हा मुलगा क्लासला ये-जा करत असे. मात्र काही दिवसांनी त्याच्या पायाच्या वेदना फार वाढल्या आणि पालकांनी त्याला रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांकडे उपचारांसाठी आणलं.

पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी या मुलाच्या पायाच्या काही चाचण्या केल्या. यामध्ये रक्तवाहिनीची सोनोग्राफी (Doppler), सीटी एन्जोग्राफी आणि एमआरआय करण्यात आला. यावरून डॉक्टरांनी या मुलाला Popliteal Artery Entrapment Syndrome असल्याचं निदान केलं. या सिंड्रोममध्ये अतिरीक्त सायकल चालवण्याने किंवा एक्सरसाईज जास्त केल्याने असामान्य स्नायू गुढघ्याच्या मागील रक्तवाहिनीवर ताण देतात आणि त्यामुळे रक्तवाहिन्या डॅमेज होतात.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना या एन्डो-वॅस्कुलर विभागाचे प्रमुख डॉ. धानेश कामेरकर म्हणाले, "या मुलाचा पाय सतत दुखत होता त्यामुळे नेमका काय त्रास आहे हे पाहण्यासाठी चाचण्या केल्या. या चाचण्यांमधून त्याला PAES असल्याचं निदान झालं. यामध्ये या मुलाच्या उजव्या गुडघ्याच्या मागची रक्तवाहिनी डॅमेज झाली होती. जी शस्त्रक्रिया करून बदलून टाकण्यात आली. हा त्रास तरूण मुलांमध्ये अधिकतर दिसून येतो."

डॉ. कामेरकर पुढे म्हणाले, "काहींमध्ये जन्मापासून काही समस्या असतात ज्यामुळे (PAES) हा त्रास पुढे जाऊन होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी दीर्घकाळ सायकल किंवा एक्सरसाईज केल्यास त्यांना हा त्रास होऊ शकतो. शिवाय हा त्रास जर एका पायात असेल तर तो दुसऱ्या पायामध्ये होण्याची शक्यता देखील अधिक असते. या मुलाच्या बाबतीतही असंच होतं. मात्र याच्या डाव्या पायातील रक्तवाहिनी न बदलता केवळ गुडघ्याच्या मागील स्नायू वेगळे करण्यात आले. आता या मुलाची प्रकृती उत्तम असून त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय."

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हा आजार फार दुर्मिळरित्या पाहायला मिळतो. पाय दुखणं हे सामान्य लक्षण असल्याने तरूणांमध्ये या आजाराचं निदान करणं कठीण असतं. या आजारात अनेकदा पाय थंड पडणं किंवा पायाची बोटं निळी पडणं ही लक्षणंही दिसून येतात. योग्यवेळी निदान झाल्याने उपचार करणं सोप झालं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top