Friday, 13 Sep, 2.21 am माय मेडिकल मंत्रा

होम
तरुणांनो, 'त्या' समस्यांबाबत तज्ज्ञांशी बिनधास्त बोला

समाजात अजूनही लैंगिक समस्यांविषयी खुलेपणाने बोललं जात नाही. मात्र तरूणांच्या मनात लैंगिक समस्यांविषयी अनेक प्रश्नही असतात. हे प्रश्न तज्ज्ञांच्या मदतीने सोडवले जावे यासाठी आता पुण्यातील प्रयास हेल्थ ग्रुपने पुढाकार घेतला आहे.

पुण्यातील प्रयास हेल्थ ग्रुपने तरूणांसाठी महत्त्वाच्या प्रश्नावर पुढाकार घेतला आहे. लैंगिक समस्या आणि रिलेशनशिपविषयी असलेल्या समस्यांबाबत समाजात अधिकतर बोललं जातं नाही. या समस्यांचं योग्यप्रकारे अन्वेषण न झाल्याने तरूणांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे प्रयास हेल्थ ग्रुपने अशा खाजगी समस्या तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यासाठी मंच उपबल्ध करून दिला आहे.

प्रयास हेल्थच्या या उपक्रमामार्फत तज्ज्ञ मंडळी तरूणांना असणाऱ्या लैंगिक समस्या किंवा त्याविषयीचे प्रश्न जाणून घेतील. हे प्रश्न जाणून घेतल्यानंतर त्यावर चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तरूणांचे हे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्ती आणि डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.

NESTS ('Non-judgemental, Empowering, Self-reflective and Technology assisted spaces) असं या उपक्रमाचं नाव आहे. हा उपक्रम गेल्या आठवड्यात सुरु करण्यात आला असून 18 वर्षांवरील व्यक्ती या ठिकाणी त्यांच्या समस्या मांडू शकतात.

प्रयास हेल्थ ग्रुपचे वरिष्ठ डॉ. शिरीष दारक म्हणाले, "आपल्या प्रत्येकाला लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो. आणि या समस्यांचा विविध प्रकारे आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. मात्र तरीही आपण याविषयी फार कमी बोलतो. या उपक्रमाच्या माध्यमातून फक्त आम्ही लोकांशी संवाद साधणार नाही तर त्यांना असलेले प्रश्ऩ देखील सोडवणार आहोत. यामध्ये जर एखाद्याला डिप्रेशनची समस्या असेल तर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार देण्यात येतील."

डॉ. शिरीष पुढे म्हणाले, "याशिवाय नातेसंबंधामध्ये असणाऱ्या समस्यांवरही चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यात येणार आहे. या ठिकाणी तरूण मुलं मनमोकळेपणाने बोलू शकणार आहेत. जर कोणत्या डॉक्टरांना या माध्यमातून सेवा द्यायची असेल तर त्यांनी यासाठी जरूर पुढाकार घ्यावा."

प्रयास हेल्थ ग्रुपद्वारे पुण्यामध्ये एक सर्व्हेक्षण करण्यात आलं होतं. या सर्व्हेक्षणात 655 मुलं आणि 585 मुलींचा समावेश कऱण्यात आला होता. या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून तरूण मुलांना लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं होतं.

या प्रकल्पाच्या समन्वयक मैत्रेयी म्हणाल्या, "या उपक्रमामध्ये आम्ही श्रोते होणार आहोत. या उपक्रमाद्वारे कोणीही आमच्याकडे येऊन त्यांच्या समस्यांविषयी आमच्याशी बोलू शकतो. यावर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. जर कोणाला आमची मदत हवी असेल तर 7775004350 या नंबरवर संपर्क साधावा."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top