Wednesday, 24 Apr, 2.05 am माय मेडिकल मंत्रा

होम
#VoteForHealth - डॉक्टरांना हवेत 'हे' बदल

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. इतर क्षेत्राप्रमाणे आरोग्य क्षेत्रातही बदल अपेक्षित आहे. नेमके हे बदल काय असावेेत हे जाणून घेण्यासाठी माय मेडिकल मंत्रानं #VoteForHealth मोहीम सुरू केली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी या मोहिमेअंतर्गत आपली मतं मांडलीत.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निवडून येणाऱ्या नव्या सरकारकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. यात आरोग्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सोयीसुविधा तर हव्याच आहेत, मात्र त्यात या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही विसरून चालणार नाही.

रुग्णांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी डॉक्टरांना नेमकं काय हवं आहे, हे माय मेडिकल मंत्रानं #VoteForHealth मोहिमेअंतर्गत जाणून घेतलं. राज्यातील मार्ड आणि इंटर्न तसंच दिल्लीतील फोर्डा या डॉक्टरांच्या संघटनेनं आपलं मत मांडलं आहे.

यासंदर्भात 'माय मेडिकल मंत्रा'शी बोलताना मार्डच्या अध्यक्षा कल्याणी डोंगरे म्हणाल्या, "वैद्यकीय उपकरणांसह औषधांचा तुटवडा सरकारनं भरून काढला पाहिजे. जेणेकरून रुग्णांना योग्य पद्धतीनं उपचार डॉक्टरांना देता येतील. लोकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार नवीन वैद्यकीय महाविद्यालयं उभारण्याचा विचार करत आहे. पण सध्या जी वैद्यकीय रुग्णालयं कार्यरत आहेत त्यात योग्य त्या सोयी-सुविधा पुरवणं आवश्यक आहे"

मार्डचे माजी अध्यक्ष डॉ. लोकेशकुमार चिरवटकर म्हणाले, "डॉक्टरांची कमतरता असल्याने डॉक्टरांवर कामाचा भार पडतो आहे. यासाठी पहिलं म्हणजे सरकारनं प्रत्येक स्पेशालिटीमध्ये डॉक्टरांची संख्या वाढवली गेली पाहिजे. शिवाय या डॉक्टरांचे तासही निश्चित करून दिले पाहिजेत. यामुळे देखील डॉक्टरांवरील ताण कमी होण्यास मदत होईल."

डॉ.लोकेश पुढे म्हणाले, "अजून एक गोष्ट म्हणजे आरोग्य क्षेत्रासाठी सरकारने बजेट वाढवलं पाहिजे किंवा आरोग्य क्षेत्रासाठी सरकारने वेगळ्या स्वतंत्र बजेटचा विचार करावा. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यातील नातं सुधारण्यासाठी देखील सरकारने प्रयत्न करावे. जोपर्यंत औषधं, वैद्यकीय उपकरणं, आणि कर्मचारी रूग्णांच्या संख्येप्रमाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत रूग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नातं दृढ होणार नाही."

तर राज्यातील वैद्यकीय इंटर्न असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दर्शन कलाल म्हणाले, "रूग्णांच्या सुरक्षेसोबत डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित होतो. त्यामुळे डॉक्टरांना सुरक्षा मिळेल यासाठी सरकारने पहिल्यांदा प्रयत्न केले पाहिजे. 30-40 तास डॉक्टरांनी काम केल्यावर त्यांच्यावरील ताण वाढतो. जर डॉक्टरांची संख्या वाढवली तर हे ताणाचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सरकारने डॉक्टरांची संख्या वाढण्यावर भर दिला पाहिजे."

डॉ. कलाल पुढे म्हणाले, "अनेकदा रूग्णांना तपासताना डॉक्टरांना देखील इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशावेळी डॉक्टरांचं आरोग्य बिघडू नये यासाठी योग्य त्या सोईसुविधा सरकारने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे."

तर दिल्लीतील फोर्डाचे अध्यक्ष डॉ. सुमेध संदनशीव म्हणाले, "डॉक्टरांच्या आरोग्याच्या विचार करता सरकारने त्यांच्या कामाचे तास निश्चित केले पाहिजे. तसंच डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्द्यावर देखील सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. शिवाय सरकारी रूग्णालयांकडून डॉक्टरांना आरोग्यविमा देण्यात यावा"

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top