जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला बसणार आहेत. आज सकाळी १० वाजता उन्हात खाट (बाज) टाकून जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात होईल.
काल रात्री राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटीत जाऊन जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत विखे पाटील आणि लाड यांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र जोपर्यंत मागण्यांचे लेखी आश्वासन मिळत नाही आणि त्याची अंमलबजावणी किती दिवसांत होणार हे स्पष्ट केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. सरकारचे शिष्टमंडळ रिकाम्या हाताने परतल्यामुळे आता जरांगे आज सकाळी १० वाजल्यापासून उन्हात बसून आंदोलन करणार आहेत. यावर सरकार आता काय तोडगा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

