Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भंडारा-गोंदियात डॉ. परिणय फुके यांची खेळी यशस्वी; नाना पटोलेंना धक्का, काँग्रेसचे चार नगरसेवक भाजपमध्ये!

भंडारा-गोंदियात डॉ. परिणय फुके यांची खेळी यशस्वी; नाना पटोलेंना धक्का, काँग्रेसचे चार नगरसेवक भाजपमध्ये!

Nagpur Today 1 week ago

भंडारा : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भंडारा-गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचा प्रभाव असलेल्या साकोली विधानसभा मतदारसंघातील लाखांदूर नगरपंचायतीचे चार काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

या घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवसाआधी झालेल्या या पक्षांतरामुळे काँग्रेस गोटात खळबळ उडाली आहे. भाजपचे विधान परिषद आमदार डॉ. परिणय फुके आणि लाखांदूरचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नाना पटोले यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि लाखांदूर नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक मुकेश उर्फ बंटी सहजानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसच्या विद्यमान महिला नगरसेविका निशा बगमारे, लोभा शिलार आणि लता कुडेगावे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला आणखी एक धक्का दिला.

दरम्यान, भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. भाजपने अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी साकोली मतदारसंघात नाना पटोले यांना अवघ्या २०८ मतांच्या फरकाने कडवी झुंज दिली होती.

तर काँग्रेसने माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र प्रफुल्ल अग्रवाल यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. मागील निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

भंडारा-गोंदिया मतदारसंघ हा नाना पटोले यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो. मात्र, मतदानाचा अधिकार असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनाच आपल्या बाजूला वळवण्यात भाजपला यश आल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे.

लाखांदूर नगरपंचायतीतील काँग्रेसचे संख्याबळ कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या राजकीय घडामोडी आगामी निवडणुकीचे समीकरण बदलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi