Dailyhunt
गुलाल उधळू नका; 'हा शेवट नाही, नवी सुरुवात'; विजयानंतर सुनेत्रा अजित पवार यांचे भावूक आवाहन

गुलाल उधळू नका; 'हा शेवट नाही, नवी सुरुवात'; विजयानंतर सुनेत्रा अजित पवार यांचे भावूक आवाहन

Nagpur Today 1 week ago

बारामती - विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी मोठी आघाडी घेत विजय जवळपास निश्चित केला आहे.

नवव्या फेरीअखेर त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी असल्याचे चित्र आहे.

निकाल स्पष्ट होताच सुनेत्रा पवार यांनी 'एक्स'वर भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. त्यांनी मतदारांचे आभार मानत हा विजय आदरणीय अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित केला.

त्या म्हणाल्या, "दादांच्या आठवणींनी आपण सर्व भावूक झालो आहोत. त्यामुळे कुणीही विजयाचा जल्लोष करू नये, मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम ठेवून त्यांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया."

बारामतीकरांचे आभार मानताना त्यांनी भविष्यातील दिशा देखील स्पष्ट केली. "हा शेवट नाही, ही तर नव्या बारामतीच्या उभारणीची सुरुवात आहे," असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार आघाडीवर होत्या. नवव्या फेरीअखेर त्यांनी ७७,१०३ मतांची आघाडी घेत निर्णायक विजयाकडे वाटचाल केली आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी झालेली ही पोटनिवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या विजयामुळे बारामतीतील त्यांचे नेतृत्व अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi