Dailyhunt
नागपुरात आंतरराज्यीय गांजा तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश; ३ अटकेत, ४ किलोहून अधिक गांजा जप्त!

नागपुरात आंतरराज्यीय गांजा तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश; ३ अटकेत, ४ किलोहून अधिक गांजा जप्त!

Nagpur Today 1 week ago

नागपूर- शहरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी ठोस आणि प्रभावी कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ ने 'थंडर स्ट्राईक' या विशेष मोहिमेंतर्गत सक्करदरा परिसरातील आशीर्वाद नगर येथे छापा टाकून गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४ किलोपेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत एक लाख रुपयांहून अधिक असल्याचे समजते. यासोबतच मोबाईल फोन, रोकड आणि विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांच्या ताब्यात आले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी नागपूरचे नसून हैदराबाद आणि मुंबईशी संबंधित आहेत. त्यामुळे हा केवळ स्थानिक गुन्हा नसून आंतरराज्यीय स्तरावर कार्यरत असलेल्या गांजा पुरवठा साखळीचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सूत्रांनुसार, आरोपी नागपूरमध्ये गांजा खरेदी करून तो तेलंगणा येथे नेण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्यांचा डाव उधळून लावला. या कारवाईदरम्यान दोन आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद समीर मोहम्मद बजीरुद्दीन, शेख मोहम्मद शेख अब्दुल आणि मोहम्मद अकबर बाबा यांचा समावेश आहे. तर फरार आरोपींमध्ये मोहम्मद जहाँगीर बाबा मोहम्मद कादर आणि अज्जू यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ च्या नंदा मनघटे यांनी माहिती देताना सांगितले की, "या संपूर्ण नेटवर्कचा सखोल तपास सुरू असून पुढील आणि मागील सर्व दुवे शोधले जात आहेत. फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल."

या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक केले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi