Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपुरात 'राजा शिवाजी' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन; रितेश देशमुखांनी उलगडला निर्मितीचा प्रवास!

नागपुरात 'राजा शिवाजी' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन; रितेश देशमुखांनी उलगडला निर्मितीचा प्रवास!

Nagpur Today 2 weeks ago

नागपूर : बहुचर्चित 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेते रितेश देशमुख नागपुरात दाखल झाले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीमागील अनुभव, भावना आणि पडद्यामागील किस्से उलगडले.

पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मनात असलेला अपार आदर आणि प्रेरणा यामुळे हा चित्रपट साकारण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. "हे स्वप्न पूर्ण करताना अनेक कलाकारांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता साथ दिली, हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे," असे त्यांनी नमूद केले.

चित्रपटाची एक विशेष बाब म्हणजे सलमान खान, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, जिनिलीया देशमुख, फरदीन खान आणि विद्या बालन यांसारख्या दिग्गज कलाकारांनी कोणतेही मानधन न घेता काम केले आहे. शिवाजी महाराजांविषयी असलेल्या आदरातून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

'राजा शिवाजी' हा चित्रपट जिओ स्टुडिओज प्रस्तुत असून मुंबई फिल्म कंपनी निर्मित आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती स्वतः रितेश देशमुख यांनी केली आहे. निर्माती म्हणून ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
संगीताची धुरा अजय-अतुल या जोडीकडे असून छायाचित्रणाची जबाबदारी संतोष सिवन यांनी सांभाळली आहे.

यावेळी देशमुख यांनी चित्रपट निर्मितीतील मूलभूत बाबींवरही भाष्य केले. "कोणताही चित्रपट उभा राहताना लिखाण हा त्याचा पाया असतो. पाया मजबूत असेल तरच इमारत भक्कम उभी राहते. त्याचप्रमाणे दिग्दर्शनही तितकेच महत्त्वाचे असते," असे ते म्हणाले.

या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, नेतृत्वगुण आणि प्रेरणादायी जीवनप्रवास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi