Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपुरात रिमांड होमची खिडकी तोडून चार अल्पवयीन आरोपी फरार; एकाला पुण्यातून अटक

नागपुरात रिमांड होमची खिडकी तोडून चार अल्पवयीन आरोपी फरार; एकाला पुण्यातून अटक

Nagpur Today 1 week ago

नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणकर चौक येथील रिमांड होममधून चार अल्पवयीन आरोपी खिडकी तोडून फरार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. फरार झालेल्या आरोपींमध्ये सुमारे दोन महिन्यांपूर्वी कामठी येथे झालेल्या हत्याकांडातील आरोपीचाही समावेश असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. यातील एका आरोपीला पुण्यातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या रिमांड होममध्ये कामठी हत्याकांडासह सदर आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांतील अल्पवयीन आरोपींना ठेवण्यात आले होते. फरार झालेल्या आरोपींपैकी एका आरोपीला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी पिस्तूल बाळगल्याच्या प्रकरणात ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला नागपुरातील रिमांड होममध्ये आणण्यात आले होते.

शनिवारी रात्री चारही अल्पवयीन आरोपींनी रिमांड होममधून पळून जाण्याचा कट रचला. त्यांनी लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा केला. स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्यांनी तेथील खिडकी तोडली आणि त्या मार्गाने बाहेर पडत वेगवेगळ्या दिशेने पळ काढला.

घटना लक्षात येताच कपिलनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान एका आरोपीच्या पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक पुण्याला रवाना झाले आणि संबंधित आरोपीला ताब्यात घेतले. उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे.

कपिलनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी एका आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi