Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; पतंजलीच्या दिव्य फार्मसीचा 73 लाखांचा औषधसाठा जप्त

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; पतंजलीच्या दिव्य फार्मसीचा 73 लाखांचा औषधसाठा जप्त

Nagpur Today 2 weeks ago

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळ, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत आता पतंजली समूहाच्या दिव्य फार्मसीवर मोठी कारवाई करण्यात आली असून, सुमारे 73 लाख 25 हजार रुपयांच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

एफडीएने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दिव्य फार्मसीच्या काही उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये गंभीर आजारांवर खात्रीशीर उपचार होतात, असे दावे करण्यात आले होते. कर्करोग, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांवर हमखास परिणामकारक उपचार मिळतात, तसेच वैज्ञानिक आधार नसलेल्या चमत्कारिक उपचारांचे दावे जाहिरातींमधून करण्यात आल्याचे तपासात आढळून आले.

प्रशासनाच्या मते, अशा प्रकारच्या जाहिराती ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या असून त्या औषध व सौंदर्यप्रसाधन कायदा, 1940 मधील तरतुदींचे उल्लंघन करतात. त्यामुळे संबंधित औषधसाठ्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली.

कारभार हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही संस्था किंवा व्यक्तींना माफ केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला होता. त्यानुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि आवश्यक असल्यास संबंधितांना न्यायालयासमोर उभे केले जाईल, असे एफडीएने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुंढे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागात विशेष मोहीम राबवण्यात आली. या काळात 53 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, भेसळ आणि अन्य गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या 33 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi