Saturday, 24 Jul, 10.37 am नाशिक LIVE

होम
स्मार्ट बस सेवा सुरू झाली पण.

नाशिक लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । सत्ताधारी भाजपाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट बससेवेच्या माध्यमांमधून १५ दिवसांमध्ये एक लाख प्रवाशांनी प्रवास केला असला तरी, बससेवेच्या माध्यमातून दैनंदिन किती नफा होतो वा किती तोटा होतो याची माहिती अद्यापही कागदावरच आहे. खुद्द आयुक्त कैलास जाधव हेच त्याबाबत अनभिज्ञ असून येत्या सोमवारी ते यासंदर्भात आढावा घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात बससेवेचा तोटा अधिक असून त्यामुळे घाईघाईत दुसऱ्या टप्प्यातील ५० बसेस सुरू होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आयुक्त जाधव यांनी देखील त्यास दुजोरा दिला आहे.

८ जुलैपासून स्मार्ट बससेवा सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ५२ बस शहरातील १३ मार्गांवर सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात तपोवन ते बारदान फाटा, तपोवन ते सिम्बायोसिस कॉलेज, तपोवन ते पाथर्डी गाव, सिम्बायोसिस कॉलेज ते बोरगड, तपोवन ते भगूर, नाशिक रोड ते बारदान फाटा, नाशिकरोड ते अंबड गाव, नाशिकरोड ते निमाणी, नाशिकरोड ते तपोवन या ९ मार्गांवर बस धावत होत्या. नंतर नवीन चार मार्गही वाढविले अाहेत.

८ ते २२ जुलै पर्यंत प्रवाशांची संख्या एक लाख २ हजार ४९ पर्यंत पोहचली आहे. तर पंधरा दिवसात २० लाखांचा महसूल मिळाला आहे. मात्र प्रतिबस, प्रति फेरीमागे अपेक्षित उत्पन्न किती व त्या प्रमाणामध्ये किती महसूल मिळत आहे त्याबाबतचे गणित पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे नाही. केवळ आयुक्तच नाही तर यांत्रिकी विभागाचे प्रमुख बाजीराव माळी यांनी देखील शनिवारी याबाबत माहिती देतो, असे उत्तर दिल्याने नफा-तोट्याची जबाबदारी असलेल्या पालिकेची बेफिकिरी दिसून आली आहे.

गुरुवारी ११ हजार प्रवासी; प्रतिसाद वाढण्याची आशा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असल्याने अद्यापही जास्तीत जास्त नाशिककर खासगी वाहनांनी प्रवास करत आहे. त्यामुळे बससेवेला प्रतिसाद कमी अाहे. या बससेवेला सरासरी ८ ते ९ हजार प्रवासी दरराेज मिळत आहेत. बुधवारी ८ हजार ८० प्रवाशांनी या बससेवेचा वापर केला. तर गुरुवारी ही संख्या ११ हजार ४९ प्रवाशांपर्यंत गेली. प्रवासी संख्या वाढत असल्याची बाब पालिकेसाठी सुखद असून असाच ट्रेंड राहिला तर तोट्याची आकडे कमी होणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Nashik Live
Top