Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई

अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई

पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा सहा ते आठ टक्के निश्चित परताव्याच्या आमिषाने व्यावसायिकाची २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूककरणाऱ्या कंपनीच्या फरार संचालकाला ‘फिजी’ देशातून भारतात आणण्यात आले.

राहुल शामराव काळोखे असे या आरोपीचे नाव आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड नोटीस जारी केल्यानंतर त्याचा तो फिजीमध्ये असल्याचे समजले होते. त्यानंतर भारत सरकारच्या विविध यंत्रणांच्या समन्वयातून त्याला भारतात आणण्यात आले. फिजीमधून डिपोर्ट केल्यानंतर कालोखेला मुंबईत आणण्यात आले. त्याच्याविरोधात अहिल्यानगरमध्येही गुन्हा दाखल असल्याने मुंबईत आल्यानंतर अहिल्यानगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. तेथील पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

खोट्या आमिषाला पडले बळी

राहुल काळोखे आणि त्याच्या साथीदारांनी इनफिनाइट बेकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व ट्रेडस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. दरमहा सहा ते आठ टक्के निश्चित नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना वेळेत नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मोठ्या रकमा गुंतविण्यास भाग पाडण्यात आले. याच आमिषाला पुण्यातील व्यावसायिक अमित चंद्रशेखर बोरसे बळी पडले. त्यांनी सुरुवातीला ११ लाख रुपये गुंतविले. त्यांना नफ्यासह रक्कम परत मिळाल्याने कंपनीवरील त्यांचा विश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने तब्बल २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपये गुंतविले.

‘ट्रेडस’ अ‍ॅपवर दाखवला बनावट नफा

'ट्रेडस' अ‍ॅपवर त्यांच्या खात्यावर सातत्याने नफा जमा होत असल्याचे दिसत होते. मात्र, एप्रिल २०२५ मध्ये बोरसे यांनी गुंतविलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आठ जणांविरुद्ध गुन्हा

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात राहुल काळोखे याच्यासह नवनाथ औताडे, अगस्त मिश्रा, सचिन खडतरे, चेतन धर, प्रसाद कुलकर्णी, ययाती मिश्रा आणि गौरव सुखदेवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर काळोखे परदेशात पसार झाला होता. महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीनंतर इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड नोटीस जारी केली. त्यानंतर त्याचे लोकेशन फिजीमध्ये असल्याचे समोर आले.

फिजीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात

फिजीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सीबीआय, परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय, महाराष्ट्र पोलिस आणि फिजी प्रशासनाच्या समन्वयातून कालोखेला भारतात आणण्यात आले. सीबीआयने या कारवाईला अधिकृत दुजोरा दिला आहे.

School Violence : शाळेत धक्कादायक प्रकार ! 8 वर्षांच्या चिमुकल्याला गळ्याला पकडून उचलले अन्…; मुख्याध्यापकाची क्रूर वर्तणूक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra