Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ajit Doval Lokmanya Tilak Award Pune: अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार; अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात गौरव

Ajit Doval Lokmanya Tilak Award Pune: अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार; अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात गौरव

  • पुण्यात राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा
  • एनएसए अजित डोवाल यांचा सन्मान
  • अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात गौरव
Ajit Doval Lokmanya Tilak Award Pune: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 106 व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval ) यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अमित शहा यांनी अजित डोवाल यांना पारंपरिक पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह, धनादेश आणि ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची प्रत भेट देऊन त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाचे आयोजन लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात अजित डोवाल यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Amit Shah Pune Visit: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेस कार्यकर्त्यांना धरपकड

देशातील दिग्गजांच्या यादीत अजित डोवाल

या पुरस्कारामुळे अजित डोवाल यांचे नाव या सन्मानाने गौरविण्यात आलेल्या देशातील दिग्गज व्यक्तींच्या यादीत समाविष्ट झाले आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग आणि इंदिरा गांधी यांसारख्या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले की, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आयुष्यभर दिलेल्या असामान्य, धाडसी आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सर्वानुमते अजित डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कारकीर्द

अजित डोवाल हे 1968 बॅचचे केरळ कॅडरचे आयपीएस अधिकारी असून भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. पोलिस सेवेत असताना त्यांनी पाकिस्तानमधील अंडरकव्हर मोहिमा तसेच मिझोराम शांतता प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

देशाच्या सुरक्षेसाठी केलेल्या धाडसी कार्याबद्दल त्यांना ‘कीर्ती चक्र’ हा शांततेच्या काळातील देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कारही मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारे ते देशातील पहिले पोलिस अधिकारी ठरले आहेत.

मान्यवरांची उपस्थिती

या पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रसेवा, राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा गौरव करणारा हा सोहळा विशेष ठरला.

या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले असून, पुरस्कार वितरणानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रवादी विचारांचा आणि देशसेवेच्या प्रेरणेचा गौरव केला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार हा देशसेवा, राष्ट्रनिर्माण आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जाणारा प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो.

Purandar International Airport साठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra