Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Akasa Air : अकासा एअरने राजस्थानमध्ये केला प्रवेश! या नव्या मार्गिकेवरून होणार प्रवास सुरु

Akasa Air : अकासा एअरने राजस्थानमध्ये केला प्रवेश! या नव्या मार्गिकेवरून होणार प्रवास सुरु

भारतातील वेगाने वाढणाऱ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या अकासा एअरने राजस्थानमध्ये प्रवेश करत उदयपूरला आपल्या देशांतर्गत नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. १५ ऑक्टोबर २०२६पासून मुंबई आणि बेंगळुरूहून उदयपूरसाठी दररोज थेट उड्डाणे सुरू होणार असून, यामुळे राजस्थानातील प्रमुख पर्यटनस्थळाची हवाई संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे.

कंपनीच्या या निर्णयामुळे पर्यटन, व्यावसायिक प्रवास आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी उदयपूरला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एबीबी इनोव्हेशन सेंटर मध्ये 37 देशांतील 1,000 हून अधिक नवोन्मेषक एकत्र आले; औद्योगिक एआय विकासाला मिळणार गती

उदयपूरसाठीच्या उड्डाणांचे बुकिंग अकासा एअरच्या संकेतस्थळासह मोबाईल अॅप, प्रमुख ट्रॅव्हल एजंट्स आणि ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवर सुरू झाले आहे. प्रीमियम पर्यटन, डेस्टिनेशन वेडिंग आणि अनुभवाधारित प्रवासासाठी देशभरातून वाढणारी मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. राजस्थानातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या उदयपूरला थेट जोडल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

अकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी आनंद श्रीनिवासन यांनी सांगितले की, उदयपूर हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असून, सुट्टी आणि पर्यटनासाठी या शहराला वर्षभर मोठी मागणी असते. मुंबई आणि बेंगळुरूहून थेट सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांना अधिक जलद आणि सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार मजबूत आणि मागणीआधारित नेटवर्क उभारण्यावर कंपनीचा सातत्याने भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

१५ ऑक्टोबरपासून बेंगळुरू-उदयपूर आणि मुंबई-उदयपूर या दोन्ही मार्गांवर दररोज नॉन-स्टॉप उड्डाणे उपलब्ध असतील. सकाळ आणि दुपारच्या वेळेत नियोजित या सेवांमुळे पर्यटनासह व्यावसायिक प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. राजस्थानकडे जाणाऱ्या हवाई प्रवासासाठी हा पर्याय अधिक सोयीचा आणि वेळेची बचत करणारा ठरणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

अल्पावधीतच अकासा एअरने आधुनिक विमानांचा ताफा, ग्राहककेंद्री सेवा आणि नाविन्यपूर्ण सुविधांच्या जोरावर भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. विमानांमध्ये अधिक लेगस्पेस, यूएसबी चार्जिंग पोर्ट्स, 'कॅफे अकासा'मधील विविध खाद्यपदार्थ, तसेच 'अकासा गेटअर्ली', 'सीट अँड मील डील', 'एक्स्ट्रा सीट' आणि 'अकासा हॉलिडेज'सारख्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय 'स्कायस्कोर', 'स्कायलाईट्स' आणि 'क्वायटफ्लाईट्स' यांसारखे ग्राहकाभिमुख उपक्रमही कंपनीने सुरू केले आहेत.

Instamart : इन्स्टामार्टच्या मुख्य व्यवसाय अधिकारीपदी गौतम स्वरूप; उत्पादन श्रेणी विस्तारावर भर

उदयपूरचा समावेश हा अकासा एअरच्या विस्तार धोरणातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. देशातील उच्च क्षमतेच्या पर्यटन बाजारपेठांना मजबूत हवाई संपर्क उपलब्ध करून देत मागणीआधारित नेटवर्क उभारण्याच्या कंपनीच्या धोरणाला या नव्या सेवेमुळे आणखी बळ मिळणार आहे. आगामी काळातही देशांतर्गत नेटवर्कचा विस्तार करून अधिकाधिक शहरांना जोडण्याचा कंपनीचा मानस असल्याचे संकेत या घोषणेतून मिळाले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra