Sunday, 09 May, 8.28 pm नवराष्ट्र

होम
अकोला | चिताग्नी देण्यास मुलाचा नकार; मनपा अधिकाऱ्याने केले अंत्यसंस्कार

आपली आई कोरोनामुळे दगावली असल्याची माहिती मिळाल्यावरही तिचा मुलगा अंत्यसंस्कारासाठी आला नाही. उलट आपल्या आईवर महानगरपालिकेने अंत्यसंस्कार करावेत, असे लेखी निवेदन देऊन एका पोटच्या गोळ्याने कळस गाठल्याची घटना येथे घडली.

    अकोला (Akola). आपली आई कोरोनामुळे दगावली असल्याची माहिती मिळाल्यावरही तिचा मुलगा अंत्यसंस्कारासाठी आला नाही. उलट आपल्या आईवर महानगरपालिकेने अंत्यसंस्कार करावेत, असे लेखी निवेदन देऊन एका पोटच्या गोळ्याने कळस गाठल्याची घटना येथे घडली. मुलगा आपल्या आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येत नसल्याचे पाहून मनपाचे आरोग्य विभाग प्रमुख यांनीच त्या अनोळखी महिलेचा मुलगा होवून तिच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले.

    हे सुद्धा वाचा

    कोरोना महामारीत रुग्णांची संख्या वाढत असताना त्यामुळे होत असलेल्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक हे शेवटच्या क्षणी स्मशानभूमीत जातात. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करून त्यांच्याप्रती आपली संवेदना व्यक्त करतात. परंतु, एका मुलाने चक्क आईचे अंत्यसंस्कार मनपाने करावे, असे लिहून देत आईप्रति असणारी जबाबदारी झटकण्याचा प्रकार घडला. शहराच्या दक्षिण झोनमध्ये राहणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

    त्या महिलेचा मृतदेह हा सामाजिक कार्यकर्ते जावेद जकारिया यांच्या पथकाने मोहता मिल स्मशानभूमीत आणला. दुपारपासून त्या महिलेचा मृतदेह स्मशानभूमीत पडलेला होता. याची माहिती मनपा आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने चक्र फिरवीत या महिलेच्या मुलाचा शोध घेतला. त्या मुलाच्या घरी आरोग्य निरीक्षक यांना पाठविण्यात आले. त्या निरीक्षकांनी त्या मुलाला, तुमची आई वारली असल्याचा निरोप दिला. त्या मुलाने स्मशानभूमीत येत नसल्याचे सांगितले. तसेच, त्याने एक पत्रही त्या आरोग्य निरीक्षकास लिहून दिले.

    माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला मी जर आलो तर मलाही कोरोनाचा प्रादुर्भाव होवू शकतो. त्यामुळे, मनपानेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे, असे त्याने पत्रात लिहिले. हे पत्र पाहून आरोग्य प्रमुख प्रशांत राजूरकर चक्रावून गेले. दुपारपासून आणलेल्या या वृद्ध महिलेवर सायंकाळ होत आली तरी अंत्यसंस्कार होत नसल्याने शेवटी राजूरकर यांनीच त्या वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करून सामाजिक बांधिलकी जपली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top