अमरावती: एकेकाळी केवळ प्रादेशिक विमानतळ म्हणून ओळखला जाणारा बेलोरा विमानतळ आता विदर्भातील महत्त्वपूर्ण एव्हिएशन हब बनण्याच्या दिशेने वेगाने झेप घेत आहे. एप्रिल २०२५ पासून नियमित व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर विमानतळावरील हालचालींमध्ये सातत्याने वाढ झाली.
त्यामुळे आता नाईट लँडिंग सुविधा, अत्याधुनिक फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) आणि भविष्यात देशातील विविध शहरांशी थेट हवाई संपर्काची शक्यता यामुळे अमरावतीच्याआर्थिक विकासाला नवी गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) बेलोरा विमानतळाचा प्रादेशिक एव्हिएशन हब म्हणून सर्वांगीण विकास करीत आहे.(फोटो सौजन्य - istock)
विमानतळावरील धावपट्टी, आधुनिक टर्मिनल आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) सुविधा सध्या कार्यरत असून, नाईट लैंडिंगसाठी आवश्यक असलेली एअरफिल्ड ग्राउंड लाइटिंग (एजीएल) आणि इतर तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर रात्रीच्या वेळेस तसेच प्रतिकूल हवामानातही विमानांची सुरक्षित उड्डाणे आणि लँडिंग शक्य होणार आहे. त्यामुळे विमानसेवा अधिक नियमित, विश्वासार्ह आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहे.
विदर्भाच्या विकासाचे नवे प्रवेशद्वारः
तज्ज्ञांच्या मते, नाईट लँडिंग सुविधा, फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर आणि भविष्यातील विस्तारित हवाई सेवांमुळे बेलोरा विमानतळ हा केवळ अमरावतीचाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भाच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरू शकतो. उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि रोजगार या सर्व क्षेत्रांना नवी ऊर्जा देत बेलोरा विमानतळ विदर्भाच्या विकासाचे नवे प्रवेशद्वार म्हणून उदयास येण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
बेलोरा विमानतळावर उभारण्यात येत असलेले अत्याधुनिक फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) हे विदर्भासाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. येथे वैमानिक प्रशिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी येण्याची शक्यता असून, विमानवाहतूक क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षक, तंत्रज्ञ आणि इतर कुशल मनुष्यबळासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे अमरावतीची ओळख केवळ प्रवासी विमानसेवेपुरती मर्यादित न राहता एव्हिएशन शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणूनही निर्माण होणार आहे.
बेलोरा विमानतळाचा विस्तार केवळ प्रवासी सेवापुस्ता मर्यादित राहणार नसून त्याचा थेट लाभ अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मिळणार आहे. आतापर्यंत उद्योगपती, निर्यातदार आणि व्यावसायिकांना मुंबई, पुणे किंवा नागपूरमार्गे दीर्घ प्रवास करावा लागत होता. सुधारित हवाई संपर्कामुळे व्यावसायिक बैठका, गुंतवणूकदारांच्या भेटी, औद्योगिक प्रकल्प आणि कॉर्पोरेट व्यवहार अधिक वेगाने पार पडतील. स्थानिक व्यापारी संघटनांच्या मते, बेलोरा विमानतळ पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यानंतर अमरावती हे नव्या उद्योगांसाठी आकर्षक गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येईल, संत्रा, कापूस, सोयाबीन आणि इतर कृषी उत्पादनांच्या व्यापाराला चालना मिळेल. तसेच प्रक्रिया उद्योग, गोदाम व्यवस्था, कोल्ड स्टोरेज आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

