हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येकाला सणाला विशेष महत्व आहे. त्याप्रमाणेच प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीसुध्दा मोठ्या आनंदात आणि भक्तिभावाने साजरा केली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवारी होणार आहे.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे भक्त मनापासून उपवास करतात. उयाशिवाय गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून बाप्पाला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. नैवेद्यात कायमच बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवले जाते. पण नेहमीच तेच ठरविक पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यात दाखवण्याऐवजी तुम्ही रसाळ आंब्याचा वापर करून झटपट मोदक बनवू शकता. या पद्धतीने बनवलेले आंब्याचे मोदक चवीला अतिशय सुंदर लागतात. तुम्ही बनवलेले आंब्याचे मोदक लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया आंब्याचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य - pinterest)
साहित्य:
- आंब्याचा गर
- ओल्या खोबऱ्याचा किस
- वेलची पावडर
- गूळ
- सुका मेवा
- तूप
- तांदळाचे पीठ
- मीठ
- केशर
- दूध
कृती:
- आंब्याचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम, आंबे काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर साल काढून आंब्याचे तुकडे करा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून पेस्ट तयार करा.
- कढईमध्ये तूप गरम करून त्यात सुका मेवा भाजा आणि काढून घ्या. त्यानंतर तूप टाकून त्यात ओल्या खोबऱ्याचा किस घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार गूळ आणि आंब्याचा गर घालून व्यवस्थित मिक्स करा.
- तयार केलेल्या मिश्रणात वेलची पावडर आणि भाजून घेतलेला सुका मेवा घालून मिश्रण घट्टसर होईपर्यंत मिक्स करा.मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
- टोपात १ ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. गरम पाण्यात अर्धा वाटी दूध आणि चमचाभर तूप घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात आंब्याचा गर घाला आणि उकळी काढून घ्या.
- आंब्याच्या मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून चमच्याने मिक्स करा आणि एक वाफ काढून गॅस बंद करा. तांदळाचे पीठ हलकेसे थंड झाल्यानंतर व्यवस्थित मळून घ्या.
- पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी बनवून घ्या. पारी तयार करून झाल्यानंतर त्यात आंब्याचे मिश्रण भरून मोदकाच्या काळ्या पाडून घ्या.
- मोदक वाफवण्यासाठी टोपात पाणी गरम करून त्यावर मोदकांची चाळणी ठेवा. मोदक आणखीनच सुंदर दिसण्यासाठी त्यावर तुम्ही केशर सुद्धा लावू शकता.
- १५ मिनिट मोदक व्यवस्थित वाफवून घ्या. त्यानंतर वाफवलेल्या मोदकांवर पाणी शिंपडून मोदक सर्व्ह करा.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हापूस आंब्याचे चविष्ट मोदक.

