Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बावधन पोलिसांकडून वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपींसह विधिसंघर्षित बालक ताब्यात; तब्बल 'इतक्या' दुचाकी जप्त

बावधन पोलिसांकडून वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपींसह विधिसंघर्षित बालक ताब्यात; तब्बल 'इतक्या' दुचाकी जप्त

पिंपरी : मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

या तपासातून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असल्याने आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलीस पथक म्हाळुंगे-नांदे रस्त्यावर गस्त घालत असताना युनिकॉर्न मोटारसायकलवरून जाणारा एक तरुण पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. संबंधित मोटारसायकलला क्रमांकपाटी नव्हती. तसेच वाहनाच्या कागदपत्रांविषयी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी मोटारसायकलच्या इंजिन आणि चेसिस क्रमांकाची तपासणी केल्यानंतर ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित तरुणाची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हिंजवडी परिसरासह विविध ठिकाणांहून मोटारसायकली आणि मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमित लाड जाधव (वय २०), वसंत अंकुश जाधव (वय २५) आणि सुनील लहू जाधव (वय २५) यांच्यासह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीच्या सात मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये आहे.

या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील चार, हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन आणि शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण सात चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि तपास पथकाने केली.

हे सुद्धा वाचा : पत्नीची हत्या करून मागितली मदत; मित्राने 112 वर काॅल करत पोलिसांसमोर उघड केला संपूर्ण हत्येचा कट

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra