Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भुजबळ - महाजनांमध्ये अबोला? गिरीश महाजनांबाबतच्या चर्चांवर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण, नाशिकच्या रस्त्यांच्या अवस्थेवरून मोठे विधान

भुजबळ - महाजनांमध्ये अबोला? गिरीश महाजनांबाबतच्या चर्चांवर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण, नाशिकच्या रस्त्यांच्या अवस्थेवरून मोठे विधान

  • नाशिकच्या रस्त्यांच्या अवस्थेवरून भुजबळांनी व्यक्त केला संताप
  • गिरीश महाजनांशी मतभेदांच्या चर्चांना भुजबळांचा नकार
  • “हे मीडियाने तयार केलेले चित्र” म्हणत दिले स्पष्टीकरण

नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.

शहरातील खराब रस्त्यांमुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासन आणि महापालिकेच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

त्यांच्या वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्याशी मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता स्वतः भुजबळ यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण देत कोणताही अबोला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नेमकंप्रकरणकाय ?

नाशिकमधील अपघातांवर बोलताना भुजबळ यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी संबंधित यंत्रणांना जबाबदार धरले होते. खराब रस्त्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. “ज्या प्रकारे एका प्रकरणात मदत देण्यात आली, त्याचप्रमाणे इतर मृतांच्या कुटुंबीयांनाही समान न्याय मिळायला हवा. जबाबदारी एकमेकांवर ढकलून उपयोग नाही,” असे ते म्हणाले होते.

महायुतीत वाढणार संघर्ष? क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया देत नाशिकमधील विकासकामांची माहिती दिली होती. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. डांबरी रस्त्यांऐवजी अधिक टिकाऊ व्हाइट टॉपिंग रस्ते तयार करण्यात येत असून, भूमिगत विविध सुविधा, कॅमेरे आणि आधुनिक नागरी विकासाची कामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील सहा महिन्यांत बहुतांश कामे पूर्ण होतील आणि नाशिकचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भुजबळांचीप्रतिक्रियाकाय ?

दरम्यान, या वक्तव्यांनंतर महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, नाशिक येथे आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ यांनी या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.

“हे सगळं मीडियाने तयार केलेलं चित्र आहे. कार्यक्रमात हार अर्पण करण्यासाठी जात असताना गिरीश महाजन यांनीच मला हात देऊन वर घेतले. भाषणादरम्यान एखादा नेता दुसऱ्याचं बोलणं ऐकत असतो किंवा स्वतःच्या भाषणाचा विचार करत असतो. त्यातून वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही,” असे भुजबळ म्हणाले. त्यामुळे गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात कोणताही अबोला किंवा राजकीय संघर्ष नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, नाशिकच्या विकासकामांबाबत दोघांचे उद्दिष्ट समान असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून महायुतीत खळबळ? बच्चू कडू, संजय शिरसाट यांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra