Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Bus Accident : अंबड तालुक्यात भरधाव एसटी बसेस एकमेकांना धडकल्या; जखमींचा आकडाही समोर

Bus Accident : अंबड तालुक्यात भरधाव एसटी बसेस एकमेकांना धडकल्या; जखमींचा आकडाही समोर

अंबड : जालना-बीड महामार्गावरील अंबड तालुक्यातील शहापूर गावानजीक गल्हाटी नदीच्या पुलावर शनिवारी (४ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ३० ते ४० प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

चालकासह १५ प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना जालना येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमीत बहुतांश विद्यार्थी यांचा समावेश आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आठवडाभरात या ठिकाणी बस अपघाताची ही दूसरी घटना आहे. या अपघातामुळे पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक तासभर ठप्प झाली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी रुग्णालयांत जाऊन जखमींची विचारपूस केली.

शहापूरच्या ग्रामस्थांची तत्परता; जेसीबीच्या साहाय्याने हटवली वाहने

अपघातानंतर गल्हाटी नदीच्या पुलावर मोठा आवाज होताच शहापूर येथील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत बसमध्ये अडकलेल्या जखमी विद्यार्थी आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, तात्काळ इतर वाहने आणि रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुलावरच अपघात झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अखेर क्रेन आणि जेसीबी मशीन बोलावून दोन्ही अपघातग्रस्त बसेस बाजूला काढण्यात आल्या आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

दोन्हीही पुलावर धडकल्या बस

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, शनिवारी सकाळी भांबेरीहून बस (क्र. एमएम १४, एमएच १७५०) अंबडकडे जात होती. आणि जालन्याहून बीडकडे जालना ते अक्कलकोट बस (क्र. एमएच १४-बीटी. ३०२२) वडीगोद्री-जालना मार्गावरून जात होती. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास दोन्ही बस शहापूर येथील गल्हाटी नदीच्या पुलावर आल्या असता अंबडहून बीडकडे जाणाऱ्या बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दोन्ही बसची समोरासमोर जोराची धडक झाली. भांबेरीहून येणाऱ्या बसमध्ये सकाळी शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणारे बहुतांश विद्यार्थी प्रवास करत होते. धडक इतकी भीषण होती की, बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात ३० ते ४० प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याच ठिकाणी नवीन पुलाचे काम चालू असून दोन्ही पुलांना बस जाऊन अडकल्यामुळे नवीन पुलामुळे दोन्ही बस नदीत कोसळल्या नाहीत. त्यामुळे सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली.

हे सुद्धा वाचा : थायलंडमध्ये भीषण अपघात! अल्पवयीन मुलाने यात्रेकरुंच्या अंगावर चढवला ट्रक; ८ बौद्ध भिक्षूंचा दुर्दैवी मृत्यू

जखमींची नावे, १५ जण गंभीर

चांद पाशा शेख (वय ६०, रा. टेंभी अंतरवाली, ता. घनसावंगी), कोमल अंकित शिंदे (वय २८, रा. बीड), बसचालक सारंग काकासाहेब ढोले (वय ५२, रा. अंबड), दुसरा बसचालक संजय कोंडीराम ठोसर (वय ४०, रा. बीड) सुषमा सतीश पाचगे (वय ४०, रा. मुंबई), निलेश चंद्रकांत देशमुख (वय ४०, रा. जालना), आक्रम अहमद (रा. राजस्थान), स्वाती अभिमन्यू कांबळे (रा. बीड), जगन्नाथ मनोहर रोटे (रा. धाकलगाव), मनोहर गणपतराव घार्गे (रा. बीड) सुनिता स्वप्निल दाबाडे (रा. जालना), रेखा स्वप्निल दाभाडे (रा. जालना), विद्या रामेश्वर वाहुळ (रा. अंबड) अन्य एक जण अशी जखमींची नावे असून या सर्वांवर अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन जालना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमीमध्ये दिशा गाडगे, शोभाबाई कुलभूषण घडे, विद्या लक्ष्मण गिते (रा. जालना), दिपक निवृत्ती सांगळे यांच्यासह अनेक जणांवर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अनेक जखमी खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra