Dailyhunt
Chennai Airport : धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी; चेन्नई विमानतळावरील धक्कादायक प्रकार!

Chennai Airport : धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी; चेन्नई विमानतळावरील धक्कादायक प्रकार!

  • धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी
  • चेन्नई विमानतळावरील धक्कादायक प्रकार!
  • प्रवाशाला घेतले ताब्यात
चेन्नई : चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाने टॅक्सींग दरम्यान विमानाचे आपत्कालीन द्वार उघडून उडी मारल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुरक्षा रक्षकांनी संबंधित प्रवाशाला अटक करून ताब्यात घेतले आहे. विमानाच्या आपत्कालीन दरवाजातून उडी मारणाऱ्या या प्रवाशाचं नाव मोहम्मद निझामुद्दीन शरीफ असं आहे. अधिकारी त्या प्रवाशाची चौकशी करत असून त्याच्या मानसिक स्थितीचीही तपासणी केली जात आहे.

२३१ प्रवाशांसह एअर अरेबियाचे विमान रविवारी सकाळी शारजाहून चेन्नईला पोहोचले. जेव्हा विमान टॅक्सीवेवर (धावपट्टी आणि टर्मिनलला जोडणारा रस्ता) चालत होते, तेव्हा विमानातील ३४ वर्षीय तरुणाने अचानक आपत्कालीन द्वार उघडले. या घटनेची माहिती मिळताच वैमानिकाने त्वरित विमान थांबवले आणि अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. माहिती मिळताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, बॉम्ब शोधक पथक आणि सशस्त्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेप्रकरणी वैमानिकाने अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली.

विमानातील आपत्कालीन द्वारे ही केवळ आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित आणि वेगाने बाहेर काढण्यासाठी वापरली जातात. त्यांचा विनाकारण वापर करणे केवळ अयोग्यच नाही, तर त्यामुळे गंभीर समस्या आणि धोका निर्माण होऊ शकतो.

विमानतळाचे कामकाज काही काळ विस्कळीत

चौकशीदरम्यान मोहम्मद निझामुद्दीन शरीफनं परस्परविरोधी विधानं केली आणि दावा केला की, कोणीतरी आपल्याला ठार मारेल या भीतीनं आपण विमानातून उडी मारली. या वर्तनामुळं सुरक्षा अधिकाऱ्यांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर त्यांनी मोहम्मद निझामुद्दीन शरीफची खरी ओळख पटवण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळं विमानतळाचे कामकाज काही काळ विस्कळीत झालं होतं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra