Dailyhunt
Devendra Fadnavis: "जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध.",  देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Devendra Fadnavis: "जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध.", देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले की, मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन व्यवसायाची राजधानी आहे. 'सिस्टर स्टेट' असलेल्या महाराष्ट्राचे आणि वाकायामा प्रांताचे अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत. महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतादरम्यान 2013 मध्ये सहकार्याचा सामंजस्य करार झाला होता आणि 2023 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. या कालावधीत दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय देवाणघेवाण झाली आहे. वाकायामा प्रांताच्या सहकार्याने जपानी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून अजिंठा परिसरातही जपानी पर्यटकांसाठी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

Karjat News : शेती आणि जनावरांसाठी पाणी अडवणं गरजेचं; नाल्यावर सिमेंट बंधारा टाकण्यात यावा, गावकऱ्यांची मागणी

दोन वेळा झालेल्या जपान दौऱ्यादरम्यान वाकायामा आणि कोयासन येथे भेट दिल्याच्या आठवणी सांगून कोयासन विद्यापीठात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, हे दोन्ही देशांतील मैत्रीचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 2023 मध्ये वाकायामाचे दिवंगत राज्यपाल यांच्या उपस्थितीत सुमो पहेलवानांचा संघ मुंबईत आला होता. गेटवे ऑफ इंडिया परिसरात सुमो आणि भारतीय कुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याची आठवण त्यांनी सांगितली. सध्या जपानचे सुमो पहेलवान पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत आहेत. या क्रीडा क्षेत्रातील देवाणघेवाणीमुळे दोन्ही देशांना उत्कृष्ट खेळाडू घडविण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांची आठवण करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यांनी भारताशी मैत्री अधिक दृढ केली. त्यांच्या कार्यकाळात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले. मुंबईत 40 कि.मी. लांबीची भूमिगत मेट्रो, 22 कि.मी. लांबीचा देशातील सर्वात मोठा समुद्री पूल उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार

अफगाणिस्तानातील बामियानच्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या विध्वंसाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे त्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांना दिला. नागपूर शहर डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून पुनरुज्जीवन घडवून आणलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. या उपक्रमातून जगाला शांततेचा संदेश जाईल आणि भारत-जपान मैत्रीचे प्रतीक निर्माण होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. विविध क्षेत्रातील शिष्टमंडळाने मुंबईस भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी 'अरिगातो गोझायमास' असे जपानी भाषेत आभार मानले.

BMC Politics: ७४ हजार कोटींचे बजेट आणि सत्तेचा सारीपाट; BMCच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra