ढोकळा हा गुजरातमधील लोकप्रिय पदार्थ असला तरी हा पदार्थ अनेकांना आवडतो. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ढोकळा अनेकांच्या पसंतीस उतरतो. बाजारात मिळणारा मऊ, जाळीदार आणि स्पॉंजी ढोकळा घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न अनेकजण करतात, मात्र काही छोट्या चुकांमुळे तो कडक, चिवट किंवा आतून कच्चा राहतो.
योग्य साहित्य, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत वापरली तर घरच्या घरीही परफेक्ट ढोकळा सहज तयार करता येतो. जाणून घ्या मऊ-स्पॉंजी ढोकळ्याची सोपी रेसिपी.
ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- २ कप बेसन
- १ कप दही
- १ चमचा लिंबाचा रस
- १ चमचा साखर
- चवीनुसार मीठ
- १ ईनोचे पॅकेट
- अर्धा कप पाणी
- १ चमचा तेल
- मोहरी
- कढीपत्ता
- हिरव्या मिरच्या
- साखर आणि पाण्याचे मिश्रण
ढोकळा बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात बेसन चाळून घ्या. त्यात दही, मीठ, साखर, लिंबाचा रस आणि पाणी घालून गाठी न राहता मऊसर बॅटर तयार करा. हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा. यानंतर स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवा. ढोकळ्याचे भांडे तेल लावून तयार ठेवा. आता बॅटरमध्ये ईनो किंवा बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने एकदा मिसळा. लगेच हे मिश्रण भांड्यात ओता आणि स्टीमरमध्ये ठेवा. मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटांसाठी हे मिश्रण वाफवून घ्या. शिजल्यानंतर सुरी किंवा टूथपिक घालून तपासा. परफेक्ट बेक झाल्यास ढोकळा दुसऱ्या ताटात काढून घ्या. नंतर एका पॅनमध्ये मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या. यामध्ये साखर आणि अर्धा कप पाणी मिक्स करुन उकळवा आणि तयार ढोकळ्यांवर पसरवा. मऊ-स्पॉंजी ढोकळा पुदीन्याची चटणीसोबत सर्व्ह करा.ढोकळा बनवताना होणाऱ्या सामान्य चुका
- बेसनात गाठी राहिल्यास ढोकळा जाळीदार होत नाही आणि आतून कच्चा राहू शकतो.
- योग्य कन्सिस्टन्सी नसल्यास ढोकळा फुगत नाही आणि चवही बिघडते.
- ईनो जास्त वेळ ठेवल्यास त्याचा प्रभाव कमी होतो आणि ढोकळा स्पॉंजी राहत नाही.
- जास्त वाफवल्याने ढोकळा कोरडा आणि कडक होतो.
- फोडणीसोबत गोडसर पाणी घातल्याने ढोकळा अधिक मऊ राहतो.

