Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Exclusive Series: ना पदवी, ना पाठ्यपुस्तक, दिशा पिंकी शेख एक प्रभावी नजर, पारलिंगी व्यक्तीच्या नजरेतून लिंगसमभाव

Exclusive Series: ना पदवी, ना पाठ्यपुस्तक, दिशा पिंकी शेख एक प्रभावी नजर, पारलिंगी व्यक्तीच्या नजरेतून लिंगसमभाव

  • विद्यार्थ्यांना लिंग समभावाची जाणीव करून देणं आवश्यक
  • पारलिंगी व्यक्तीच्या नजरेतून ही जाणीव
  • दिशा पिंकी शेखच्या मार्गदर्शनातून घडला प्रवास
आकाशी रंगाची साडी, कपाळावर ठळक टिकली आणि हलकासा मेकअप केलेल्या दिशा पिंकी शेख यांनी लिंग समभाव प्रशिक्षण कक्षात आत्मविश्वासाने, सहजपणे प्रवेश केला.
धाराशिव जिल्ह्यातील विविध शाळांमधूनआलेल्या शिक्षकांना संबोधित करताना त्यांनी एक जाणीवपूर्वक आपली पारलिंगी ओळख बाजूला ठेवली आणि प्रथम स्त्री-पुरुष या दोन लिंगांमधील भेदभावावर चर्चा करण्यास सुरुवात केली.

“लैंगिक समानतेतील पहिली लढाई स्त्री आणि पुरुष यांच्यातील आहे. पारलिंगी येतील, पण नंतर.” हे वाक्य त्यांनी शांतपणे पण नेमकेपणाने म्हटले. त्यांच्या "वेगळं" असण्याचा तणाव त्यामुळे हळूहळू निवळला. आधी सावध असलेल्या नजरा आता भीतीऐवजी कुतूहलाने त्यांच्याकडे वळल्या. हे दिशा यांचे वैशिष्ट्यपूर्ण तंत्र आहे. लोकांची मानसिकता जशी आहे तिथूनच त्या सुरुवात करून मग नवीन विचार त्यांच्यामध्ये रुजवतात. “मी येथे एक प्रशिक्षक म्हणून आले आहे, केवळ पारलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी लढायला नाही,” त्या नंतर म्हणाल्या. “या प्रशिक्षण सत्रांमधील बहुतेक सहभागी स्त्री किंवा पुरुष असतात. मी फक्त पारलिंगींबद्दल बोलले, तर लक्ष विचलित होते. लढ्यात लोक दुसऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवतात, पण स्वतः लढा द्यायला मात्र टाळतात.” हीच धोरणात्मक स्पष्टता आणि मानसशास्त्राची समज घेऊन दिशा २०१४ पासून लिंग समभाव या विषयावर प्रशिक्षक म्हणून काम करतात.

Exclusive Series: मुलगे साडीची घडी घालतात आणि मुली हाती हातोडा घेतात तेव्हा…खेळातून उमगला लिंग समभावाचा अर्थ

आज दिशा धाराशिवमध्ये मावा संस्थेचे प्रतिनिधी म्हणून अंगाई-युनिसेफच्या (UNGEI-UNICEF) लिंग समभाव कार्यक्रमांतर्गत शालेय शिक्षकांना प्रशिक्षण देतात. धाराशिवमध्ये २०२२ पासून या कार्यक्रम किशोरवयीन मुले, शिक्षक आणि समुदायांसाठी राबवण्यात आला. देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या 'मीना राजू मंच'च्या माध्यमातून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला. या कार्यक्रमातून खेळाधारित शिक्षणातून लिंगभेदाच्या रूढींना आव्हान देण्यासाठी सक्षम केले. मीना राजू मंच जो इयत्ता ६वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला जातो. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता. त्यामध्ये शाळांसोबतच ग्रामपंचायत, गावातील लोक आदींनाही सहभागी करून घेण्यात आलं.

दिशा यांनी गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रभर सरकारी शाळा, खासगी संस्था आणि सामुदायिक केंद्रांमध्ये अनेक सत्रे घेतली आहेत. त्या केवळ लैंगिक समभाव शिकवत नाहीत तर त्या समाजशास्त्राला संवादाच्या माध्यमातून मांडतात, गुंतागुंतीच्या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करतात आणि अस्वस्थ करणाऱ्या सत्याला मांडायला घाबरत नाहीत. आणि हे सगळे त्या लिंग समभाव अभ्यासातील कोणत्याही पदवीशिवाय करतात. “मी अनुभवातून माझं स्वतःचं तंत्र विकसित केलं आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे, माझे अनुभव, आपल्या परिसरातील घटना यांना अर्थ देण्याचा माझा प्रयत्न असतो. कदाचित मी औपचारिक प्रशिक्षण घेतलं असतं, तर मी स्वतःला पुस्तकी चौकटीत मर्यादित केलं असतं,” त्या म्हणाल्या.

एक पारलिंगी व्यक्ती म्हणून त्यांचा वैयक्तिक प्रवासच त्यांना ती प्रशिक्षण देण्यासाठी लागणारी पार्श्वभूमी तयार करतो आणि विश्वासार्हताही. उत्तर महाराष्ट्रातील श्रीरामपूर या छोट्याशा गावात मुलगा म्हणून जन्मलेल्या दिशा यांना वाढत्या वयात स्वतःबद्दल वेगळेपणा जाणवू लागला. “मला मुलीसारखे वाटत असे. पण मला या भावनांचा अर्थ तेव्हा लागत नव्हता आणि कुटुंबाच्या बंधनांची भीती वाटत होती,” त्या म्हणाल्या. स्वतःच्या शोधात वयाच्या पंधराव्या वर्षी त्या घरातून बाहेर पडल्या. लवकरच त्यांना पारलिंगी समुदायासाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेचा आधार मिळाला. समुपदेशन सत्रांमधून त्यांनी स्वतःची लैंगिक ओळख समजून घेण्यास सुरुवात केली. काही सत्रांनंतरच त्यांनी मनमोकळेपणाने बोलून स्त्री म्हणून आपली ओळख स्वीकारली. तिथेच त्यांना लिंग समभावावर पहिले प्रशिक्षण मिळाले आणि आपले सत्य न घाबरता सांगण्याचा आत्मविश्वासही.

Exclusive Series: ग्रामीण वर्गखोल्यांमध्ये रूढींना आव्हान, एका शिक्षकाच्या धाडसाने संपूर्ण शाळेची व्यवस्था बदलते आहे

दिशा यांची प्रशिक्षण सत्रे समतेच्या गाण्याने सुरू करतात. अस्वस्थ विषयाला हात घालण्यापूर्वी त्या उपस्थितांना थोडं बोलकं करतात. प्रश्न विचारून, वास्तविक जीवनातील उदाहरणे देऊन, स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगून, स्थानिक घटना आणि बोलीभाषेचा वापर करून त्या लिंगभेदाकडे बोट दाखवतात. “समाज आपल्याला लैंगिक ओळख ठरवण्याची संधी देत नाही. जन्माला आल्यावरच लिंगानुसार मुलगा किंवा मुलगी अशी ओळख आपल्याला मिळते. त्यामुळे तृतीयपंथी किंवा पारलिंगी व्यक्ती आपल्याला अनैसर्गिक, चुकीच्या वाटतात. आपले फक्त प्रजनन अवयव आपली लैंगिकता ठरवू शकत नाहीत. या सामाजिक रूढी तोडल्या पाहिजेत आणि किशोरवयीन मुलांशी व्यवहार करताना आपण त्याबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे,” त्यांनी शिक्षकांना सांगितले.

त्यांचे मुद्दे इतक्या स्पष्टतेने उपस्थितांपर्यंत पोहोचतात की, श्रोते काहीवेळा स्तब्ध होऊन बसतात. “सुरुवातीला शिक्षक बोलण्यास संकोचतात. पण मी वैज्ञानिक तथ्यं आणि वास्तवावर आधारित बोलत असल्याची जाणीव त्यांना झाली की, ते मोकळेपणाने बोलू लागतात,” त्या सांगतात. धाराशिवमधील एका प्रशिक्षण सत्रात दिशा यांच्या बोलण्याचा प्रभाव इतका खोल होता की सहभागी सर्व शिक्षकांनी आपला प्रवास भत्ता त्यांच्या लिंग समभावावरील सामाजिक कार्यासाठी दिला. दिशा यांचं काम महत्त्वाचं अशासाठी आहे की, मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रथम त्यांनी लिंग समभावाची जाणीव करून दिली. कारण पुढे शिक्षकच किशोरवयीन मुलांशी संवादकाचं काम करतात. त्यामुळेच त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांशी कसं बोलावं, त्यांचा विश्वास कसा संपादन करावा आणि काही वेळेस मुलांना बोलण्याची जबरदस्ती करू नये, असे अनेक मुद्दे त्यांनी प्रशिक्षणात पटवून दिले.

दिशा यांचा लिंग समभावाबद्दलचा दृष्टिकोन समोरच्याला विचार करायला भाग पाडतो. त्या स्वीकृतीची मागणी करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचं आवाहन करतात. त्या सहानुभूती मिळवण्यासाठी आपण पारलिंगी असण्याचा वापरत नाहीत तर वास्तव स्वीकारण्यासाठी समोरच्यांना तयार करतात. दिशा पिंकी शेख केवळ लिंग समभाव शिकवत नाहीत तर प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांनाही तसं जगण्याचं आवाहन देतात.

संकलन: श्रुति गणपत्ये, माध्यम सल्लागार, युनिसेफ महाराष्ट्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra