मुंबई
गंभीर प्रकाराची दखल | मालवणीतील भाजपा कार्यकर्त्यांविरुद्धचे दंगलसदृश्य गुन्हे मागे घ्या - प्रविण दरेकरांनी पोलीस ठाण्यात जाऊन केली मागणी

मालाड मालवणी(malvani) येथील राम मंदिर निर्माणसाठीचा निधी संकलनाचा फलक अज्ञात व्यक्तींनी फाडल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडून भाजपा कार्यकर्त्यांविरोधातच(BJP workers) दंगल सदृश्य गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. पोलिसांनी हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(pravin darekar) यांनी केली आहे.
मुंबई : मालाड मालवणी(malvani) येथील राम मंदिर निर्माणसाठीचा निधी संकलनाचा फलक अज्ञात व्यक्तींनी फाडल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडून भाजपा कार्यकर्त्यांविरोधातच(BJP workers) दंगल सदृश्य गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. हा प्रकार गंभीर आहे. पोलिसांनी हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. तसेच या परिसरातील अनधिकृत बांधकांमांविरुद्ध व राजकीय आश्रय असलेल्या गुन्हेगारी प्रवृतींच्या लोकांविरोधात तातडीने कारवाई करावी अन्यथा भाजपाच्यावतीने या प्रकारांविरोधात भव्य आंदोलन छेडण्यात येईल व मोर्चा काढण्यात येईल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
भाजप शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात
मालाड मालवणी परिसरात लावण्यात आलेला अयोध्या राम मंदिर निधी संकलनासाठीचा फलक अज्ञात व्यक्तींनी फाडल्यानंतर या परिसरात वादंग निर्माण झाला. याविषयांसदर्भात विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्य नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने आज मालवणी पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची भेट घेतली.
याप्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार भाई गिरकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते आर.यु.सिंग, नगरसेविका जया तिवाना, योगिता कोळी,तेजल देसाई, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश खंडकर, भाजपचे मुंबई सचिव विनोद शेलार, योगेश वर्मा, जगदीश पटेल, सुनिल कोळी आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.
यावेळी दरेकर यांनी सांगितले की, राष्ट्र निर्माणाच्या कामात असे प्रकार होऊ नयेत यासाठी आम्ही पोलिसांकडे नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली. पण पोलिसांना भाजपाच्या कार्यकर्त्यांवर दंगलीसदृश्य गुन्हे दाखल केले. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा हा प्रकार म्हणावा लागेल. ज्यांनी गुन्हा केला ते आज मोकाट आहेत. परंतु हा संवेदनशील विषय सांमज्यस्याने सुटावा यासाठी आम्ही सहकार्याची भूमिका घेतली. तरीही आमच्या कार्यकत्यांवर कारवाई होत आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकत्यांविरोधीत जे दंगल सदृश्य गुन्हे नोंदविले आहेत ते तात्काळ काढून घ्यावेत, अन्यथा या परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार राहणार नाही असा इशारा दरेकर यांनी दिला.
गुन्हे मागे घ्या
ज्या ज्या सरकारी जागांवर अतिक्रमण आहे त्यांचा एक मास्टर प्लॅन तयार करण्यात यावा व त्यावर कारवाई करण्याबाबतची योजना तयार करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगताना ते म्हणाले की, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना येथे राजकीय आश्रय मिळत असल्याची चर्चा येथील नागरिकांमध्ये असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी तसेच या भागातील चार-चार माळ्याच्या अनिधिकृत झोपडपट्ट्यावंर सुध्दा कारवाई करावी त्याचप्रमाणे पुढील काळात या भागात अनिधिकृत झोपड्या उभ्या राहता कामा नये, भरणी होता कामा नये, मॅंग्रोव्हच्या जागेच्या ठिकाणी अनधिकृत स्टुडिओ होत आहेत. तसेच या भागात ज्या अनधिकृत देशविघातक प्रवृत्ती आहेत. या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे पण या प्रवृत्तींना जर कोणी छुपा राजकीय पाठिंबा देत असेल तर त्यांच्याविरोधात मोहिम उभी करण्यात येईल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
हे सुद्धा वाचा
दोन स्वतंत्र पोलीस ठाणे द्या
मालवणी विभाग भौगोलिक दृष्ट्या फार मोठा आहे. त्यामुळे येथे मालवणी व मढ हे दोन स्वतंत्र पोलीस स्टेशनचा प्रस्ताव अनेक दिवस प्रलंबित आहे. खासदार शेट्टी व मी सरकारकडे आग्रही राहून या विषयी गृह विभागाकडे बैठक लावण्यासाठी प्रयत्न करु. पण लवकरात लवकर पोलीस स्टेशनचा विभाजनाचा विषय निकाली काढण्यात यावा त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच दरेकर म्हणाले की, या भागातील सुमारे ७५ एकर जमीनीवर अतिक्रमण झाले आहे. एकीकडे लोकांना घरे मिळत नाही पण येथे ७५ एकर जमिनीवर बेकायदेशीरपणे अनिधिकृत बांधकामे उभी राहत आहेत, त्यामुळे पोलिसांनी कोणाच्याही राजकीय दबाबाला बळी न पडता कारवाई करावी अशी मागणी करण्यात आल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.