Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gaza: 'तोपर्यंत सैन्य गाझामधून माघार घेणार नाही', डोनाल्ड ट्रम्पच्या यांच्या शांतता योजनेला इस्रायलचा स्पष्ट नकार; नेतान्याहू ठाम

Gaza: 'तोपर्यंत सैन्य गाझामधून माघार घेणार नाही', डोनाल्ड ट्रम्पच्या यांच्या शांतता योजनेला इस्रायलचा स्पष्ट नकार; नेतान्याहू ठाम

  • नेतान्याहू यांची कडक अट
  • ट्रम्प यांच्या योजनेला विरोध
  • गाझामध्ये मृतदेहांचे उत्खनन अन् मृत्यूंचा आकडा ७३,००० पार

मध्यपूर्वेतील युद्धविराम आणि शांतता प्रक्रियेला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा शांतता कराराबाबत अत्यंत कडक भूमिका घेतली असून, “जोपर्यंत हमास पूर्णपणे निःशस्त्र होत नाही, तोपर्यंत इस्रायली संरक्षण दल (IDF) गाझामधून एक पाऊलही मागे हटणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला आहे. नेतान्याहू यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे केवळ प्रस्तावित शांतता कराराची बोलणीच रखडलेली नाहीत, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने मांडण्यात आलेल्या बहुचर्चित शांतता योजनेच्या भवितव्यावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पंतप्रधान नेतान्याहू यांनी नुकताच एक व्हिडिओ संदेश जारी करून ट्रम्प प्रशासनाकडून आलेला शांतता कराराचा मसुदा इस्रायलला मंजूर नसल्याचे जाहीर केले. “ट्रम्प प्रशासनाने आम्हाला एक मसुदा पाठवला होता, परंतु तो आम्हाला मान्य नाही. तो आमचा मसुदा नाही. आम्ही त्यावर आमचे आक्षेप आणि टिप्पण्या नोंदवून सुधारणा सादर केल्या आहेत,” असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित कराराच्या मसुद्यानुसार, इस्रायलने गाझाच्या सुमारे ६०% भागातून आपले सैन्य मागे घ्यावे आणि त्याच वेळी हमासने टप्प्याटप्प्याने निःशस्त्रीकरणाची प्रक्रिया सुरू करावी, अशी योजना होती. मात्र, इस्रायली राजकारणातील समीक्षकांच्या मते, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इस्रायली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू आपली राजकीय विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आणि कट्टरपंथी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही कठोर भूमिका घेत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Blogger Day: 5 ऑगस्टला का साजरा केला जातो 'ब्लॉगर डे'? जाणून घ्या डिजिटल युगातील 'या' खास दिवसाचा रंजक इतिहास

ढिगाऱ्याखालून निघत आहेत मृतदेह: साबरा भागात ११२ जणांवर सामूहिक अंत्यसंस्कार

एककीकडे राजकीय आणि राजनैतिक स्तरावर तणाव सुरू असताना, दुसरीकडे गाझामधून विनाशाची आणि भयानक मानवी आपत्तीची दृश्ये समोर येत आहेत. मंगळवारी गाझा शहरातील साबरा (Sabra) भागात एकाच वेळी १०० हून अधिक लोकांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे मृतदेह नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांमध्ये उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. गाझा नागरी संरक्षण (Civil Defence) या बचाव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच चालवलेल्या शोध आणि उत्खनन मोहिमेदरम्यान तब्बल ११२ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. अत्यंत वेदनादायी बाब म्हणजे, बाहेर काढण्यात आलेल्या या मृतदेहांमध्ये ४० निष्पाप मुलांचा समावेश आहे, ज्यांचे आयुष्य या युद्धाच्या ज्वालांमध्ये होरपळून निघाले.

मृत्यूचा एकूण आकडा ७३,००० च्या पार; हजारो नागरिक अजूनही बेपत्ता

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झालेल्या या विनाशकारी युद्धापासून आतापर्यंत ७३,३७७ हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वैद्यकीय आणि नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, प्रत्यक्ष मृत्यूचा आकडा यापेक्षाही खूप मोठा असण्याची शक्यता आहे.

सध्याच्या अंदाजानुसार, सुमारे ७,४०० लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि ते सिमेंटच्या ढिगाऱ्यांखालीच दबले गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गाझामधील अनेक भागांत संपूर्ण कुटुंबेच्या कुटुंबे नष्ट झाली आहेत; त्यामुळे बेपत्ता झालेल्या लोकांची नावे सांगण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी कुटुंबातील एकही सदस्य जिवंत उरलेला नाही, ही परिस्थिती अधिकच विदारक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Traffic Light Day: 5 ऑगस्टला का साजरा होतो 'वाहतूक दिवा दिन'? जाणून घ्या ट्रॅफिक सिग्नलचा रंजक इतिहास

शांतता चर्चेत ‘आधी तुम्ही मागे हटा’चा पेच

गाझा शांतता कराराची बोलणी फिसकटण्यामागे दोन्ही बाजूंच्या अटींचा क्रम हा मुख्य अडथळा ठरत आहे. इस्रायलचा असा ठाम आग्रह आहे की, जोपर्यंत हमास आपली संपूर्ण शस्त्रे स्वाधीन करत नाही आणि पूर्णपणे निःशस्त्र होत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाया थांबवल्या जाणार नाहीत आणि सैन्य माघारीचा विचार केला जाणार नाही.

दुसऱ्या बाजूला, हमासची मागणी अशी आहे की इस्रायलने आधी पूर्णपणे युद्धविराम (Ceasefire) घोषित करावा आणि गाझामधून आपले सैन्य मागे घ्यावे, त्यानंतरच निःशस्त्रीकरणाच्या टप्प्यांवर चर्चा शक्य आहे. दोन्ही बाजूंनी घेतलेल्या या ‘आधी तुम्ही मागे हटा’ या अडून बसण्याच्या भूमिकेमुळे मध्यपूर्वेतील हा संघर्ष शांत होण्याऐवजी अधिकच चिघळत चालला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra