- 1 ही रुपया जमा न करता सरकार देत आहे 25000 रुपये?
- कोणाला मिळणार फायदा?
- जाणून घ्या संपूर्ण माहिती
मुलींचे शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सरकार विविध योजना राबवते. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही त्यापैकीच एक योजना आहे. या योजनेअंतर्गत, मुलीच्या जन्मापासून ते तिच्या उच्च शिक्षणापर्यंत विविध टप्प्यांवर ₹25,000 ची आर्थिक मदत दिली जाते. पूर्वी ही रक्कम ₹15,000 होती, पण आर्थिक वर्ष 2024-25 पासून ती वाढवून ₹25,000 करण्यात आली आहे.
जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यापूर्वी या योजनेसाठी पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे. वेळेवर अर्ज केल्यावर, सरकारची आर्थिक मदत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना काय आहे?
मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही योजना ऑक्टोबर २०१९ मध्ये सुरू केली. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करणे आणि बालविवाहासारख्या सामाजिक समस्या कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत रक्कम एकाच वेळी दिली जात नाही, तर मुलीचे वय आणि शिक्षणाचे विविध टप्पे यानुसार सहा हप्त्यांमध्ये बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
कधी मिळते आर्थिक मदत?
या योजनेअंतर्गत, एकूण ₹25,000 सहा टप्प्यांमध्ये वितरित केले जातात.
मुलगी झाल्यावर ₹5,000
एक वर्षाचे सर्व आवश्यक लसीकरण झाल्यावर ₹2,000
इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर ₹3,000
इयत्ता सहावीत प्रवेश घेतल्यावर ₹3,000
इयत्ता नववीत प्रवेश घेतल्यावर ₹5,000
इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यावर किमान दोन वर्षांच्या कॉलेज, पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यावर ₹7,000
अशा पद्धतीमध्ये रकमेचं वितरण केलं जातं.
कोण घेऊ शकतं योजनेचा लाभ?
योजना फक्त उत्तर प्रदेशचे कायमचे रहिवासी असलेल्या कुटुंबांसाठीच उपलब्ध आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹३ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. साधारणपणे, प्रत्येक कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. दुसऱ्या प्रसूतीत जुळी मुले झाल्यास, तिन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. याशिवाय, जर एखाद्या कुटुंबाने कायदेशीररित्या अनाथ मुलीला दत्तक घेतले असेल, तर दत्तक मुलगी आणि अनाथ मुलगी मिळून जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
अर्ज करताना कुटुंबाचे रेशन कार्ड, कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला, मुलगी आणि पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणि मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो यांचा समावेश आहे. जर मुलगी दत्तक असेल, तर त्यासंबंधीचे कायदेशीर प्रमाणपत्र देखील सादर करावे लागेल. संबंधित टप्प्यानुसार, अर्ज करताना इतर कागदपत्रांची देखील मागणी केली जाऊ शकते.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेसाठीचा अर्ज पूर्णपणे ऑनलाइन आहे. महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन नागरिक सेवा पोर्टलद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल. ओटीपी पडताळणीनंतर एक युझर आयडी तयार केला जातो. यानंतर, लॉग इन करून मुलीची नोंदणी करता येते आणि संबंधित टप्प्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. अर्ज मंजूर झाल्यावर, पात्रतेनुसार सहाय्याची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.

