- अंटार्क्टिकाचा हिमनग सौदीला नेण्याची योजना
- प्रात्यक्षिकासाठी अलास्काहून आयवामध्ये बर्फाचा ठोकळा
- विषुववृत्ताची उष्णता आणि तांत्रिक मर्यादांमुळे योजना बारगळली
वाळवंटाच्या भूमीत पाण्याच्या एका एका थेंबाचे मूल्य सोन्यापेक्षा कमी नसते.
विशेषतः सौदी अरेबियासारख्या (Saudi Arabia) निसर्गाने पाण्याचे दुर्भिक्ष दिलेल्या देशात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे हे नेहमीच एक मोठे आव्हान राहिले आहे. आजच्या काळात सौदी अरेबिया समुद्राचे खारे पाणी गोडे (Desalination) करून आपली तहान भागवतो, परंतु १९७० च्या दशकात ही प्रक्रिया अत्यंत खर्चिक, ऊर्जा खाणारी आणि पायाभूत सुविधांवर मोठा ताण आणणारी मानली जात होती. याच काळात सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद अल-फैसल – जे तत्कालीन सौदी डिझॅलिनेशन कार्यक्रमाचे प्रमुख होते – यांनी एक अशी अकल्पनीय योजना आखली, ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. अंटार्क्टिका खंडातील महाकाय हिमनग (Icebergs) समुद्राच्या मार्गाने ओढून थेट अरबी द्वीपकल्पात आणायचे आणि वाळवंताची तहान भागवायची, अशी ही योजना होती.
या प्रकल्पाला केवळ कागदावर किंवा विज्ञानकथेपुरते मर्यादित न ठेवता, राजकुमारांनी ‘आइसबर्ग ट्रान्सपोर्ट इंटरनॅशनल’ (Iceberg Transport International) नावाची एक विशेष कंपनी स्थापन केली. त्यांची मुख्य योजना अशी होती की, अंटार्क्टिकामधील सुमारे १० कोटी टन वजनाचा एक प्रचंड मोठा हिमनग निवडायचा, त्याला वितळण्यापासून वाचवण्यासाठी खास प्लास्टिक आणि शिडाच्या कापडात (Sailcloth) गुंडाळायचे आणि प्रचंड क्षमतेच्या टगबोट्सच्या (Tugboats) साहाय्याने त्याला समुद्राद्वारे हजारो मैल ओढत सौदी अरेबियाच्या किनाऱ्यावर आणायचे. या योजनेचा मुख्य उद्देश वाळवंटी देशांना शुद्ध आणि नैसर्गिक पिण्याचे पाणी पुरवणे हा होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi Pakistan Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार पाकिस्तानला? 2027 मधील SCO Summitबाबत इस्लामाबादकडून मोठी माहिती
शास्त्राज्ञांना दाखवण्यासाठी अलास्काहून उडवला २,५०० पाउंडचा हिमनग
या कल्पनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी आणि जगभरातील शास्त्रज्ञ, अभियंते व धोरणकर्त्यांना या प्रयोगाची सत्यता दाखवण्यासाठी ऑक्टोबर १९७७ मध्ये अमेरिकेतील आयवा स्टेट युनिव्हर्सिटी (Ames, Iowa) येथे ‘हिमनग उपयोगावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद’ (First International Conference on Iceberg Utilization) आयोजित करण्यात आली. या परिषदेला जगभरातील १८ देशांतील सुमारे २०० दिग्गज शास्त्रज्ञ उपस्थित होते. परंतु, केवळ भाषणांवर आणि छायाचित्रांवर विसंबून न राहता, आयोजकांनी प्रतिनिधींना प्रत्यक्ष हिमनदीचा बर्फ पाहता यावा, यासाठी एक अभूतपूर्व मोहीम राबवली.
यूएस आर्कटिक नेव्हल रिसर्च लॅबोरेटरीच्या गोताखोरांनी (Divers) अलास्का येथील पोर्टेज लेकमधून अंदाजे २,५०० पाउंड (सुमारे १,१३३ किलोग्रॅम) वजनाचा आणि ६ फूट रुंद, ५ फूट लांब व ४ फूट खोल असा बर्फाचा एक मोठा ठोकळा निवडला. हा बर्फ वितळू नये म्हणून त्याला इन्सुलेशन आणि ड्राय आईसमध्ये घट्ट गुंडाळण्यात आले. त्यानंतर हेलिकॉप्टरने उचलून त्याला विमानात ठेवले गेले आणि शेवटी एका रेफ्रीजरेटेड ट्रकद्वारे आयवा मधील एम्स शहरात आणले गेले. या वाहतुकीसाठी त्यावेळी तब्बल ८,५०० अमेरिकन डॉलर्स खर्च आला होता, ज्यामुळे तत्कालीन वृत्तपत्रांनी त्याला “जगातील सर्वात महागडा हिमनग” (World’s Most Expensive Iceberg) असे टोपणनाव दिले होते.
आयवा स्टेट युनिव्हर्सिटीत लोकांचे आश्चर्य अन् पेयात बर्फाचे तुकडे!
हा प्रचंड हिमनग जेव्हा आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीच्याWalk-in Freezer मध्ये ठेवण्यात आला, तेव्हा तो पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. मध्य-अमेरिकेच्या मैदानी भागात हिमनदीचा एवढा मोठा बर्फ पाहणे ही तिथल्या लोकांसाठी अत्यंत कौतुकाची आणि आश्चर्याची बाब होती. परिषदेच्या वेळी उपस्थितांच्या पेयांमध्ये (Drinks) याच हिमनगाचे तुकडे टाकून देण्यात आले होते. आयोजकांचा असा विश्वास होता की, जर अंटार्क्टिकामधील बर्फ समुद्राद्वारे वाहून आणता आला, तर कोरड्या आणि वाळवंटी प्रदेशांचे हवामान आणि शेतीचे रूप पूर्णपणे बदलता येऊ शकते.
‘एन्व्हायर्नमेंट अँड सोसायटी’ पोर्टलच्या ‘आर्केडिया’ या वृत्तानुसार, हा प्रयोग केवळ एक स्टंट नसून नैसर्गिकरित्या आढळणारे हिमनग पिण्याच्या पाण्याचा व्यवहार्य जागतिक स्रोत बनू शकतात का, यावर विचार करण्यासाठी आयोजित केलेला एक गंभीर अभियांत्रिकी प्रकल्प होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War: युक्रेन युद्धाला भयंकर वळण! रशियाकडून उत्तर कोरियाच्या शस्त्रांचा वापर; पोलंडमध्ये F-16 विमाने तैनात
योजना कागदावरच का राहिली? विज्ञानाने उघड केलेले वास्तव
जरी राजकुमार मोहम्मद अल-फैसल यांच्या या योजनेने जगभरातील वर्तमानपत्रांच्या मथळ्यांवर राज्य केले आणि जगाला आकर्षित केले, तरी प्रत्यक्षात ही योजना राबवणे अशक्यप्राय ठरले. परिषदेत उपस्थित असलेल्या बर्फ आणि हवामान तज्ज्ञांनी गणिते मांडून हे सिद्ध केले की, जेव्हा हा प्रचंड हिमनग अंटार्क्टिकाहून निघून विषुववृत्त (Equator) ओलांडेल, तेव्हा तेथील उष्ण महासागरीय पाण्याच्या आणि उष्ण हवेच्या संपर्कात येताच तो वितळून नष्ट होईल.
तसेच, १० कोटी टन वजनाचा हिमनग ओढण्यासाठी लागणाऱ्या टगबोटींचा प्रचंड इंधन खर्च, आंतरराष्ट्रीय सागरी कायदे (Maritime Laws), समुद्रातील वादळे आणि पर्यावरणीय धोके या तांत्रिक मर्यादांमुळे हा प्रकल्प कधीच प्रत्यक्षात येऊ शकला नाही. अखेर, सौदी अरेबियाचा हा ‘आइसबर्ग प्रकल्प’ इतिहासातील सर्वात धाडसी, अनोखा आणि मानवी कल्पकतेचा एक थक्क करणारा वैज्ञानिक प्रयोग बनून राहिला.

