Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IPL Rules Change: .तर गोलंदाजांची चांदी होणार! IPL आणखी रोमांचक करण्यासाठी सचिन तेंडुलकरने BCCI ला दिले 3 अनोखे सल्ले

IPL Rules Change: .तर गोलंदाजांची चांदी होणार! IPL आणखी रोमांचक करण्यासाठी सचिन तेंडुलकरने BCCI ला दिले 3 अनोखे सल्ले

  • …तर गोलंदाजांची चांदी होणार!
  • IPL आणखी रोमांचक करण्यासाठी सचिन तेंडुलकरने BCCI ला दिले 3 अनोखे सल्ले
  • जाणून घ्या काय आहे ते…
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) गेल्या काही हंगामांमध्ये फलंदाजांचे प्रचंड वर्चस्व पाहायला मिळत आहे.
आता या स्पर्धेत 20 षटकांत 200 धावा करणे ही अत्यंत सामान्य गोष्ट झाली आहे. प्रथम फलंदाजी करताना 200 हून अधिक धावा करूनही कोणताही संघ स्वतःला सुरक्षित समजत नाही. आयपीएल सामन्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या खेळपट्ट्या प्रामुख्याने फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने गोलंदाजांचे काम अत्यंत कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत फलंदाज आणि गोलंदाजांमधील खेळाचा समतोल राखण्यासाठी ‘क्रिकेटचा देव’ मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) काही महत्त्वाचे आणि अनोखे सल्ले दिले आहेत. बीसीसीआयने या सूचना स्वीकारल्यास आयपीएलचे सामने अधिक थरारक आणि रंजक होऊ शकतात. टी-20 क्रिकेटमध्ये गोलंदाजांना संरक्षण देण्यासाठी आणि सामन्यात चुरस निर्माण करण्यासाठी सचिन तेंडुलकरने खालील 3 प्रमुख बदलांची शिफारस केली आहे:

1. ‘इम्पैक्ट प्लेयर’ नियम तातडीने रद्द करावा

सचिन तेंडुलकरच्या मते, टी-20 क्रिकेटमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर रूल’ (Impact Player Rule) पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. मुंबईत आयोजित एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान बोलताना त्याने सांगितले की, या नियमामुळे खेळाचा मूळ समतोल बिघडत आहे. टी-20 सामना आधीच खूप लहान (फक्त 20 षटकांचा) असतो आणि या नियमामुळे संघांना त्यांच्या फलंदाजीच्या फळीत एका अतिरिक्त फलंदाजाचा समावेश करण्याची संधी मिळते. यामुळे आधीच दबावाखाली असलेल्या गोलंदाजांच्यासमोरील आव्हाने अधिक वाढतात, जे खेळाच्या दृष्टीने योग्य नाही.

IPL 2026: 'शाब्बास अर्जुन!' मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…

2. पॉवरप्ले दोन टप्प्यात विभागला जावा

सचिनने दुसरी महत्त्वपूर्ण सूचना ‘पॉवरप्ले’बाबत केली आहे. सध्याचा पारंपारिक 6 षटकांचा पॉवरप्ले सलग एकाच वेळी घेण्याऐवजी तो दोन वेगवेगळ्या टप्प्यांत विभागला जावा, असे सचिनचे म्हणणे आहे. सुरुवातीची ४ षटके फलंदाजांसाठी निश्चित असावीत, ज्यामध्ये सध्याच्या नियमानुसार 30-यार्ड सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक (Fielders) असतील. उर्वरित २ षटके कधी वापरायची, याचा संपूर्ण निर्णय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधारावर सोडला जावा. कर्णधार सामन्याची परिस्थिती पाहून मधल्या षटकांमध्ये (Middle Overs) किंवा डेथ ओव्हर्समध्ये (Death Overs) या 2 षटकांचा वापर करू शकेल. या बदलाचा सर्वात मोठा फायदा असा होईल की, या 2 षटकांदरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सर्कलबाहेर एक अतिरिक्त म्हणजेच एकूण 3 क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी मिळेल. यामुळे कर्णधाराला धावांच्या वेगावर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल.

3. मुख्य गोलंदाजाला 5 षटके टाकण्याची संधी मिळावी

टी-20 सामन्यात सध्या एका गोलंदाजाला जास्तीत जास्त 4 षटके टाकण्याची परवानगी असते. सचिनच्या मते, हा नियम बदलून ती मर्यादा 5 षटकांची करावी. जेव्हा संघाचा सर्वात महत्त्वाचा आणि गुणवान फलंदाज पूर्ण 20 षटके फलंदाजी करू शकतो, तर संघातील सर्वात सर्वोत्तम गोलंदाजालाही एक अतिरिक्त षटक टाकण्याची संधी मिळालीच पाहिजे, असे प्रतिपादन सचिनने केले. यामुळे सामन्याचा थरार आणि दर्जा दोन्ही सुधारेल, कारण चाहत्यांना नेहमीच सर्वोत्तम खेळाडूंचा मैदानावरील संघर्ष पाहायला आवडतो.

प्रिन्स इज बॅक! पराभव झाला तरी Shubhman Gill चर्चेत, विराट अन् सचिनच्या 'या' रेकॉर्डशी केली बरोबरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra