Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जावई धोंडे जेवायला गेले अन् लाखाचा ऐवज विसरून आले; दुकानदाराला समजताच पर्स केली परत

जावई धोंडे जेवायला गेले अन् लाखाचा ऐवज विसरून आले; दुकानदाराला समजताच पर्स केली परत

नीरा : माणुसकी अजून जिवंत आहे, याची प्रचिती पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आली. सासरी धोंडे जेवणासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीचे तब्बल लाखाच्या आसपासचा ऐवज असलेली पर्स हरवली; मात्र एका प्रामाणिक दुकानदारामुळे ती सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी संबंधित दुकानदाराचा सत्कार करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.

पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील जुन्नरकर कुटुंबाचे जावई आपल्या पत्नीसह मंगळवारी सासरी धोंडे जेवणासाठी आले होते. सायंकाळी नीरा शहरात खरेदीसाठी गेल्यानंतर दिपाली कोंढारे यांची पर्स हरवली. या पर्समध्ये तब्बल ७५ हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे १५ हजार रुपये किमतीचा चांदीचा गणपती असा मौल्यवान ऐवज होता. पर्स हरवल्याचे लक्षात येताच कोंढारे कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत संबंधित महिला ज्या-ज्या दुकानांमध्ये गेल्या होत्या, तेथे चौकशी सुरू केली. यावेळी पेठेतील "चंदन स्वीट होम" या दुकानात कोंढारे कुटुंब लस्सी पिण्यासाठी गेले होते, तेव्हा ही पर्स तिथेच विसरली गेल्याचे समोर आले.

दुकानदाराने बॅग ठेवली सुरक्षित

दुकानदार राजाराम उर्फ मांगीलाल चौधरी यांनी ही पर्स सापडल्यानंतर ती सुरक्षित ठेवली होती. कोणीतरी पर्स शोधत येईल या अपेक्षेने त्यांनी ती बाजूला ठेवत दुकानातील कर्मचाऱ्यांनाही याची माहिती दिली होती. पोलिस आणि कोंढारे कुटुंबीय दुकानात पोहोचल्यानंतर चौधरी यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता ती पर्स त्यांच्या ताब्यात दिली.

रोख रक्कम, चांदीचा गणपती पर्समध्येच

पर्सची तपासणी केली असता त्यामधील ७५ हजारांची रोख रक्कम आणि चांदीचा गणपती सुरक्षित असल्याचे दिसून आले. यानंतर नीरा दूरक्षेत्रात पोलिस उपनिरीक्षक रविराज कोकरे यांच्या हस्ते चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस हवालदार संदीप मदने, धनश्याम चव्हाण, निलेश करे, प्रसाद कोळेकर, पोलिस पाटील राहुल शिंदे, तसेच बालाजी कोंढारे आणि राजू जुन्नरकर उपस्थित होते.

जाहिरात क्षेत्रातील नियमभंगात २१ टक्क्यांची वाढ! 'या' क्षेत्रांमध्ये नियम उल्लंघनाचे प्रमाण जास्त

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra