Dailyhunt
करोडो रुपये घेऊन महाराज फरार? खंडापुरातील पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीच्या गैरप्रकाराची तक्रार

करोडो रुपये घेऊन महाराज फरार? खंडापुरातील पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीच्या गैरप्रकाराची तक्रार

लातूर : लातूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लातूर शहराजवळील खंडापूर (ता. लातूर) येथे पार पडलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व पादुका दर्शन सोहळ्यात भाविकांनी अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीचा हिशोब अद्याप न दिल्याने गंभीर गैरव्यवहाराचा आरोप समोर आला असून वारकरी संप्रदायात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शाम बरुरे महाराज व इतर आयोजकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेऊन तक्रारीत संपूर्ण आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा व दोषींना अटक करावी, अशी मागणी केली आहे.

फेब्रुवारी २२ ते २ मार्च २०२६ दरम्यान संत तुकाराम महाराज व भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पादुकांच्या आगमनानिमित्त खंडापूर शिवारात नऊ दिवसीय भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरद्वारे पादुका आणण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. लाखो भाविकांनी दर्शन घेत देणग्यांचा वर्षाव केला होता. मात्र, कार्यक्रम संपून जवळपास दोन महिने उलटूनही सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांच्या शिल्लक निधीचा हिशोब अद्याप सादर करण्यात आलेला नाही.

कोट्यवधींच्या देणगीवर प्रश्नचिन्ह; पोलिसांकडे चौकशीची मागणी

आयोजन समितीतील प्रमुख महाराज कार्यक्रमानंतर संपर्काबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर संयोजकांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित महाराजांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. या प्रकरणी २८ एप्रिल २०२६ रोजी शाम बरुरे महाराज व इतर आयोजकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेऊन तक्रारीत संपूर्ण आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा व दोषींना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शाम भारतराव बरुरे, ह.भ.प. निलेश महाराज चव्हाण किल्लारीकर, बाबा महाराज बोराडे, दिलीप महाराज वलसे, चंद्रकांत ज्ञानोबा आरडले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र, या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, या सप्ताहासाठी सुमारे कोट्यवधी रूपयांचा निधी जमा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, त्यापैकी काही रक्कम खर्च झाल्यानंतर उर्वरित निधी ‘भंडारा डोंगर’ येथे संत तुकाराम महाराज मंदिरासाठी देण्याचे नियोजन होते. मात्र, निधीचा हिशोबच न दिल्याने भाविकांमध्ये विश्वासघाताची भावना निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा : तरुणावर कोयत्याने सपासप वार; फुरसुंगीत ऐन गर्दीच्यावेळी खुनाचा थरार

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra