Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कौटुंबिक वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून; भिंतीवर डोकं आपटलं अन्.

कौटुंबिक वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून; भिंतीवर डोकं आपटलं अन्.

पुणे : धायरी येथील रायकर मळा भागात कौटुंबिक वादातून सासऱ्यानेच सुनेचा खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. सासऱ्याने सुनेचे डोके भिंतीवर आपटून तसेच दगडाने मारहाण करून तिचा खून केला आणि घराला कुलूप लावून सासरा पसार झाला आहे.

पोलिस पसार झालेल्या सासऱ्याचा शोध घेत असून, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

स्वाती तेजस चौधरी (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सासरे भानुदास भास्कर चौधरी यांच्यावर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुटूंबियांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, स्वाती चौधरी यांचे पती तेजस चौधरी हे शिवाजीनगर न्यायालयात क्लर्क म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ते न्यायालयात गेले होते. त्यामुळे घरी सहा महिन्याच्या बाळासह स्वाती आणि तिचे सासरे होते. स्वाती आणि त्यांचे सासरे भानुदास चौधरी यांच्यात कौटुंबिक कारणावरून वारंवार वाद होत होते. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

यादरम्यान स्वाती या बाथरूममध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या असता भानुदास चौधरी तेथे गेले. त्यांनी स्वाती यांचे डोके भिंतीवर आपटले आणि कपडे धुण्याच्या दगडाने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला. नंतर आरोपीने घराला कुलूप लावून पळ काढला. त्यावेळी घरात स्वाती यांचे सहा महिन्यांचे बाळ होते. दुपारी दीडच्या सुमारास बाळ बराच वेळ रडत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना कळवून दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. नंतर स्वाती यांचे पती तेजस चौधरी यांना घटनेची माहिती देण्यात आली. आरोपी भानुदास चौधरी फरार असून नांदेड सिटी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra