Thursday, 25 Feb, 7.33 pm नवराष्ट्र

होम
कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन | गरीब आणि श्रीमंतांसाठी न्याय वेगळा असतो का ? राजकीय पुढाऱ्याच्या लग्न समारंभाकडे तहसीलदारांनी केला कानाडोळा

पालघरचे(palghar) तहसीलदार सुनील शिंदे(sunil shinde) व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या धुमधडाक्यात होणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्याच्या लग्न समारंभाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याची बाब उघडकीस आली आहे.

  पालघर : बोईसर येथे जाऊन मास्क परिधान न करणाऱ्या विरुद्ध कारवाई करणारे पालघरचे(palghar) तहसीलदार सुनील शिंदे(sunil shinde) व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही अंतरावरच मोठ्या धुमधडाक्यात होणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्याच्या लग्न समारंभाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेमध्ये श्रीमंताला वेगळा न्याय व गरिबांना कायद्याचा बडगा दाखवण्याची पद्धत सुरू असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे

  सार्वजनिक समारंभांमध्ये ५० व्यक्तींपेक्षा अधिक गर्दी करू नये,असे आदेश असताना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाने पालघर तालुक्यात शिरगाव,सातपाटी व उमरोळी येथे कारवाई केली. मात्र उमरोळीपासून काही अंतरावर असलेल्या खैरापाडा येथे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या घरी असलेल्या लग्न समारंभकडे या मंडळींनी सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले.

  हे सुद्धा वाचा

  या लग्न समारंभात शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी विविध राजकीय पक्षांचे नेते व मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. या ठिकाणी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित असताना तुलनात्मक कमी संकेत असलेल्या समारंभावर कारवाईचा बडगा उचलण्याचा धाडस का दाखवले नाही ? असा ही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

  पालघर जिल्हाधिकारी यांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधित महसूल विभागाने व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विभागातील लग्न सोहळ्याची माहिती आपल्याकडे असणे अपेक्षित असताना इथली माहिती कशी काय निसटली हासुद्धा शोध लावण्याचा विषय आहे. मात्र महसूल अधिकाऱ्यांचे लागे बांधे असल्याने अनेक मोठे मासे कारवाईच्या जाळ्यातून सुटल्याचे दिसून येत आहे.

  लग्न समारंभासाठी किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी घेण्यासाठी पालघर तहसील कार्यालयात सुलभ व्यवस्था नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला परवानगी घेणे जिकरीचे झाले आहे.पालघर तहसील कार्यालयावर गौण खनिज माफियांचे वर्चस्व असून त्याचा प्रभाव अनेक कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर दिसून येत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून सजग असताना बोईसर येथे शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात शिवसेनेचे सचिव,खासदार, पदाधिकारी आणि सुमारे हजारभर निमंत्रित पाहुणे उपस्थित राहतात. सेनेचे पदाधिकारी स्वपक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असतील तर सर्वसामान्यांनी काय गुन्हा केला आहे की महसूल खाते फक्त त्यांच्यावरच कारवाई करत आहे, असा प्रश्न वऱ्हाडी मंडळी उपस्थित करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top