Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात मुसळधार..
  • धरणाचे ६ वक्र दरवाजे १ फुटाने उघडले
  • मुळगाव पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता
पाटणा: सातारा जिल्ह्यातील कोयना (Koyna Dam) धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलसागर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यामुळे धरण व्यवस्थापनाने 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

धरणातून 5,129 क्युसेक्स पाणी वक्र दरवाज्यांद्वारे आणि 1,050 क्युसेक्स पाणी पायथा विद्युतगृहातून सोडण्यात येत असून, एकूण 6,129 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.

Barvi Dam: बारवी धरणातील पाणीसाठा 73.58 टक्क्यांचा टप्पा पार, ठाणे जिल्ह्याची चिंता कमी

धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढली

31 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणात 25,293 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू होती. गेल्या 24 तासांत धरणातील पाणीसाठ्यात 2.16 टीएमसीची वाढ झाली आहे.

सध्या धरणात 86.11 टीएमसी (81.81 टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

गेल्या 24 तासांत झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे:

कोयनानगर : 121 मिमी (हंगामी एकूण 2,895 मिमी)

नवजा : 174 मिमी (हंगामी एकूण 3,509 मिमी)

महाबळेश्वर, नवजा, कोयना आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे.

पाटण तालुक्यात ढगफुटीसदृश परिस्थिती

रात्री 3 वाजल्यापासून कोयना, नवजा, पाथरपुंज आणि संपूर्ण पाटण तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील लहान-मोठे ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

पाटण शहरातही रात्रीपासून अतिवृष्टी सुरू असून मुळगाव घाट पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुळगाव पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोयना धरण व्यवस्थापनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात किंवा पूरप्रवण भागात जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा; बारवी धरण ५९ टक्क्यांवर, धरणसाठ्यात समाधानकारक वाढ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra