- अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी रंगलेल्या नाट्यमय घडामोडी
- अकरावा उमेदवार न दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार
- उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे नाव पुढे केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी
Maharashtra Legislative Council Elections 2026 : विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी रंगलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. सर्व १० जागांसाठी केवळ १० अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. महायुतीने आपली मांडणी ठाम ठेवत मित्रपक्षांना सोबत घेतले. तर महाविकास आघाडीत (मविआ) निर्माण झालेला तणाव शेवटच्या क्षणी चर्चेतून निवळला.
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ९ आणि प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे एक पोटनिवडणूक अशा १० जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. कुठल्याही पक्षाने अकरावा उमेदवार न दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. ३ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना १० आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जातील.
Raj Thackeray: "मराठी बोलणार नाही, ही हिंमत येते कुठून?"; राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांसह
भाजपकडून ६, शिवसेना शिंदे गटाकडून २. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून १ आणि मविआकडून १ उमेदवारांचा अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीत उमेदवारीवरून बुधवारपासून निर्माण झालेला पेच अखेर सुटला. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे नाव पुढे केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी होती. त्यामुळे काँग्रेसकडून स्वतःचा उमेदवार देण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ठाकरे गटाचे नेते अनिल परब, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी काँग्रेस नेतृत्वाशी केलेल्या चर्चेनंतर तणाव निवळला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसने अखेर दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला.
बच्चू कडूंची शिंदेकडे शरणागती
महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. माजी मंत्री आणि प्रहर जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपला पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून आपला इरादा त्यांनी जाहीर केला आहे. पत्रकारांशी गुरुवारी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, बुधवारी रात्री उशिरा त्यांची उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांनी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या समस्यांबाबत आपल्या मागण्या मांडल्या. कडू म्हणाले की, शिंदे यांनी त्यांच्या उद्दिष्टांसाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला, कडू म्हणाले की, त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेपासूनच सुरू झाला होता. त्यामुळे याकडे नवीन सुरुवात म्हणून न पाहता, घरी परतणे म्हणून पाहिले पाहिजे.
Bachchu Kadu: 'प्रहार' करता करता बच्चू कडूंच्या हाती 'शिवबंधन'; विधान परिषदेसाठी उमेदवारी
२७ वर्षांनंतर पुनरागमन
बच्चू कडू १९९९ मध्ये अविभाजित शिवसेनेपासून वेगळे झाले होते आणि त्यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली होती. आता, जवळपास २७ वर्षांनंतर त्यांचे शिवसेनेत पुनरागमन महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
शिवसेनेकडून नीलम गोन्हे यांनाही संधी
शिवसेनेने (शिंदे गट) महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने बच्चू काडू यांच्यासोबत नीलम गोन्हे यांनाही उमेदवारी दिली आहे. बच्चू काडू शिवसेनेत सामील झाल्यानंतर त्यांना तत्काळ विधान परिषदेचे तिकीट देण्यात आले, तर नीलम गोन्हे यांच्या नावावर आधीपासूनच चर्चा सुरू होती. अखेरीस, पक्ष नेतृत्वाने दोन्ही नावांना मंजुरी दिली. उमेदवारांची घोषणा करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पक्षातील प्रत्येकाला संधी मिळेल आणि नेतृत्व प्रत्येक कार्यकर्ता व नेत्यावर लक्ष ठेवून आहे.
पक्षनिहाय उमेदवार
भाजप: सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, माधवी नाईक, संजय भेडे, विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव (पोटनिवडणूक)
शिवसेना (शिंदे गट): डॉ. नीलम गो-हे, बच्चू कडू
राष्ट्रवादी (अजित पवार गट): झिशान सिद्दीकी
शिवसेना (ठाकरे गट): अंबादास दानवे
विधानसभेतील बलाबल (२०२४)
भाजप –
१३२
शिवसेना (शिंदे) -५७
राष्ट्रवादी (अजित पवार) -४१
शिवसेना (ठाकरे) –२०
काँग्रेस -१६
राष्ट्रवादी (शरद पवार) –१०
निवडणुकीचे गणित आणि कार्यक्रम
एका जागेसाठी अंदाजे २९ मतांचा कोटा
उमेदवार अर्जाची छाननी – २ मे
अंतिम घोषणा – १२ मे

